KetakiChitaleNewsUpdate : शरद पवार यांच्यावर अभद्र टिपण्णी : केतकी चितळेला पोलिसांकडून अटक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अखेर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यावरून राज्यातील अनेक शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोशल मीडियावरही केतकी चितळेंवर मोठी टीका होत आहे.
सिनेअभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक आकाऊंटवरून ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांना उद्देशून लिहिलेली ही पोस्ट आहे. एका सभेत शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेवरून केलेल्या वक्तव्यानंतर पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी असलेली ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
या प्रकरणात केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले आहे. केतकी कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकी हिला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली आहे.