MaharashtraNewsUpdate : प्रसिद्ध गायक, संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध गायक संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत. संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे अशी पंडित शिवकुमार यांची ओळख होती.
शिवकुमार शर्मा यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. १९८५ मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांना बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.
हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जायची. १९६७ मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम तुफान लोकप्रिय झाला होता. या अल्बममध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केलं होतं.