IndoreFireNewsUpdate : धक्कादायक : “दिलजला आशिक” गजाआड, एकतर्फी प्रेमातून गेला ७ जणांचा जीव

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीशी संबंधित प्रकरणात एका ‘माथेफिरू अशिका’ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचा शोध लागताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला अटक केली . या झटापटीत तो जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले . त्याच्या या माथेफिरू कृत्यामुळे हकनाक ७ लोकांचा बळी गेला आहे.
याबाबत विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी पीटीआयला सांगितले की, स्वर्णबाग कॉलनीतील एका निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेतील आरोपी शुभम दीक्षित उर्फ संजय (२७) याला शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री लोहमंडी परिसरातून अटक करण्यात आली. काझी यांच्या म्हणण्यानुसार, दीक्षित मूळचा उत्तर प्रदेशातील झाशीचा असून काही काळ तो इंदूरमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता.
दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दीक्षित स्ट्रेचरवर पडलेला आहे आणि शहरातील शासकीय महाराजा यशवंतराव रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या एका हातातून आणि पायातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसत आहे. याबाबत एसएचओला विचारले असता, त्यांनी सांगितले कि , इंदौर जळीत प्रकरणातील तो आरोपी असून त्याच्या माथेफिरूपणामुळे निष्पाप सात जणांचे प्राण गेले आहेत. आरोपी दीक्षित लोहमंडी परिसरात पोलीस पथकाला पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्यावर दुभाजकावरून उडी मारताना पडून तो जखमी झाला.
लग्नाला नकार दिला म्हणून …
काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर फरार झालेला दीक्षित निरंजनपूर येथील त्याच्या मित्रांच्या घरी लपला होता आणि नंतर तो लोहमंडी परिसरात पोहोचला. आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या मुलीशी त्याला लग्न करण्याची इच्छा होती . दीक्षित सहा महिन्यांपूर्वी आगग्रस्त निवासी इमारतीतील एका फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून राहत होता, मात्र मुलीने नकार दिल्यानंतर तिचा बदला घेण्याच्या उद्देशाने दीक्षितने स्वर्ण बाग कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली तिची स्कूटर शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पेटवून दिली होती. या आगीने भीषण रूप धारण केल्यानंतर या आगीत एका जोडप्यासह सात जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले.
दरम्यान पोलिसांनी दीक्षित विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302 आणि 436 (इमारतीला आग लावण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थाचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या मुद्द्याव्यतिरिक्त, दीक्षित आणि संबंधित महिलेमध्ये काही दिवसांपूर्वी सुमारे 10,000 रुपयांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. त्याने सांगितले की, भीषण आगीतील आरोपी दीक्षित हा महिलेसोबत पैशाच्या वादातून सहा महिन्यांपूर्वी स्वर्णबाग कॉलनीतील निवासी इमारत सोडून गेला होता.