IndiaNewsUpdate : धर्म संसद : दिल्ली पोलिसांचे घुमजाव ,सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर “हेट स्पीच ” प्रकरणी गुन्हा दाखल …

नवी दिल्ली : दिल्लीतील “धर्म संसदे”तील ‘हेट स्पीच’ प्रकरणी आधी असे काहीच झाले नाही म्हणणाऱ्या पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने फटकार लागवल्यानंतर मात्र पोलिसांनी आयोजकांविरुद्ध “द्वेषपूर्ण भाषणा” केल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत एक नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी नवीन प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की , त्यांनी उपलब्ध सामग्रीची तपासणी केल्यानंतर एफआयआर नोंदवला आहे. तक्रारीतील सर्व दुवे आणि सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध इतर सामग्रीचे विश्लेषण केले गेले आणि YouTube वर एक व्हिडिओ सापडला त्यामुळे याप्रकरणी आता कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
दरम्यान ‘हेट स्पीच’ प्रकरणी सामग्रीची पडताळणी केल्यानंतर, 4 मे रोजी ओखला औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 295A, 298 आणि 34 अंतर्गत गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आपल्या पूर्वीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, पुरावे आणि सामग्रीच्या तपासणीचे निष्कर्ष दर्शवतात की , भाषणात कोणत्याही विशिष्ट समुदायाविरूद्ध द्वेषयुक्त भाषण नव्हते. आणि तिथे जमलेले लोक आपल्या समाजाची नैतिकता वाचवण्याच्या उद्देशाने आले होते.
मुस्लिमांच्या नरसंहारासाठी खुले आवाहन असा अर्थ लावता येईल, अशा शब्दांचा वापर केलेला नाही, असे पोलिसांनी म्हटले होते. यावर सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले आणि चांगले प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर ९ मे रोजी सुनावणी होणार आहे.