MansukhHirenMurderCase : प्रदीप शर्मा हाच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ..

मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. हिरेन यांना मारण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचा धक्कादायक दावा देखील एनआयएकडून करण्यात आला आहे.
एनआयएच्या दाव्यानुसार मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकाने भरलेली एक चारचाकी गाडी आढळली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला घाबरवण्यासाठी हा मोठा कट आखण्यात आला होता. संबंधित स्फोटकाने भरलेली चारचाकी गाडी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती.
NIA has filed an affidavit in the Mansukh Hiren murder case in Bombay High Court, in response to the bail application of Shiv Sena leader and former 'encounter specialist' of Mumbai Police Pradeep Sharma. NIA opposed his bail calling him the main conspirator in the case.
— ANI (@ANI) May 4, 2022
दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हिरेन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते . या प्रकरणाची सर्व माहिती मनसुख हिरेनला होती. त्यांनी तोंड उघडले तर आपल्या अडचणी वाढतील, अशी भीती सचिन वाझे आणि इतर आरोपींना होती. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून मनसुख हिरेन यांची हत्या केली. ५ मार्च २०२१ रोजी ठाण्यातील एका खाडीत हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हेच या हत्येमागील मुख्य सूत्रधार होते, असा दावा एनआयएने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
न्यायालयासमोर प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना एनआयएने सांगितले की तो निर्दोष नाही. त्याने गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्ये यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. न्यायमूर्ती ए. एस.चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी. ए. सनप यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी आता १७ जुलै रोजी ठेवली आहे.
दरम्यान न्यायालयाला एनआयएने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आरोपी प्रदीप शर्मा हा अंबानी कुटुंबासह लोकांमध्ये दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य होता. तर मनसुख हिरेन हा या कटातील कमकुवत दुवा होता. हिरेनला या कटाची संपूर्ण माहिती होती. त्याने तोंड उघडले तर आपण अडचणीत येऊ, अशी भीती आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांना होती. यातूनच त्यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.