AurangabadNewsUpdate : राज ठाकरे यांच्या सभेवर एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांनी दिली “हि” प्रतिक्रिया

औरंगाबाद : मनसेप्रमुख राज ठाकरे त्यांच्या सभेच्या निमित्ताने औरंगाबादेत मुक्कामाला हजर झालेले असतानाच एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसीसुद्धा आपल्या नांदेड दौऱ्याच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले आहेत. या निमित्ताने बोलताना खा. ओवैसी यांनी, कोणी काहीही म्हणत असले तरी राज्याची कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे सांगत महाराष्ट्रात सध्या दोन भावांचे भांडण सुरू असल्याचे सांगत त्यांनी मनसेसह शिवसेनेवरही पुन्हा एकदा निशाणा साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
उद्या १ मे रोजी महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंबादमध्ये होत आहे. या सभेसाठी राज ठाकरे औरंगाबादेत दाखल झाले. तर, दुसरीकडे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी हे देखील औरंगाबादेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. उद्या त्यांची नांदेडला सभा होणार आहे. या सभेसाठी ओवेसी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वी एमआयएमचे खासदार जलील यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी ते औरंगाबादेत दाखल झाले आहेत.
दरम्यान राज ठाकरे यांचे सायंकाळी साडे पाच वाजता औरंगाबाद जोरदार स्वागत करण्यात आले . त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले . तर खासदार जलील यांच्या इफ्तारला हजेरी लावण्यासाठी असदुद्दीन ओवेसी यांचे ६ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादेत आगमन झालं. जलील यांच्या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. खुद्द ओवेसी इफ्तारसाठी आल्याने एमआयएमच्या कार्यकर्ते आनंदून गेले होते. रमजान महिन्याच्या समाप्तीला आता दोनच दिवस राहिले आहेत. रमजान ईद हा सण आनंद आणि उत्साहाचा आहे. माणसा-माणसांतील प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागो, अशा शब्दात ओवेसींनी महाराष्ट्रवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
खा. जलील यांचे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारले नाही
इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिलं होते . पण राज ठाकरे यांनी जलील यांना निमंत्रण स्वीकारलं नाही. राज ठाकरे इफ्तार पार्टीला येतील, अशा अशावाद जलील यांना होता. राजसाहेब रिस्पॉन्स द्या, सभेआधी इफ्तार पार्टीला नक्की या, आम्हाला बरं वाटेल, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी काल केले होते.
राज ठाकरे हे हिंदूंचे ओवेसी आहेत असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे , यावर बोलताना ते म्हणाले कि , “महाराष्ट्रात दोन भावांचं भांडणं सुरु आहे. दोघा भावांच्या भांडणात माझे नाव घेतले जात आहे. भावा-भावांची भांडणं त्यांनी बसून सोडवली पाहिजेत. ओवेसी माझ्या वडिलांचं नाव आहे. मालकांच्या घरातलं फर्स्ट्रेशन संजय राऊत माझ्यावर का काढत आहेत?”, अशा शब्दात त्यांनी सेना-मनसेवर टीका केली. दरम्यान “राज ठाकरेंच्या सभेला जाणून बुजून परवानगी दिली गेली. आता सभेला परवानगी दिली आता शांतता आणि सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्वप्नातही मी येत असेन”, अशी टोलेबाजी ओवेसी यांनी केली. तुम्ही इतके दिवस भाजपसोबत हनिमून साजरी केलं ते काय होतं? तुम्ही २०१४ आणि २०१९ ला मोदींना मत द्या म्हणाले. तुम्ही कलम ३७० च्या निर्णयाला पाठिंबा दिला”, अशी टीकाही ओवैसींनी केली.
हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा…
दरम्यान राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबतचा अल्टिमेटम दिला आहे. याबाबत ओवैसी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याबाबत प्रश्न विचारावे, आमचे इम्तियाज जलील मुख्यमंत्री असते तर आम्ही त्याचे उत्तर दिले असते , अशी प्रतिक्रिया दिली. एमआयएम पक्षाला भाजपची B टीम असल्याची टीका केली जाते. याबाबत ओवैसी यांना प्रश्व विचारला असता त्यांनी संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर दिलं. “तुम्ही आम्हाला बी टीम म्हणता. आम्ही डील केलं आणि आम्ही लढून शिवसेनेला हरवलं. संजय राऊतांना त्याचा त्रास आहे. औरंगाबादच्या हिंदू, मुस्लिम, दलित जनतेने शिवसेनेचा पराभव केला. त्याचा राग संजय राऊत यांना आहे. त्याचा राग ते माझ्यावर काढतात”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
आमचे नाव ऐकून त्यांच्या पोटात दुखायला लागते…
काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत ओवैसी यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आता काय बोलायचं? ते आमच्या नावावरच द्वेश करतात. आमंचे नाव ऐकून त्यांच्या पोटात दुखायला लागतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील मुस्लिम जनतेला धोका दिला. विधानसभेत बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही बाबरी मशिद पाडली, असे विधान करतात. या विधानाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार समर्थन देतील का? सत्तेत बसून गुलाबजाम खात आहेत”, असा घणाघात ओवैसी यांनी केला.
राणा दाम्पत्यावरील कारवाईचे समर्थन
दरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात खा. ओवेसी यांनी राणा दाम्पत्यावर राज्य शासनाने केलेली कारवाई योग्य आहे . आम्ही जर पंतप्रधानाच्या घरासमोर कुराण वाचू म्हटले तर चालेल का ? हे योग्य नाही कोणी कोणच्या घरासमोर जाऊन धार्मिक कार्यकर्म करणे योग्य नाही . देश द्रोहाच्या कालमाबद्दल बोलताना ते म्हणाले याबाबत न्यायालय काय तो निर्णय घेईल त्यावर आपण कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.