MaharashtraPoliticalUpdate : कारण राजकारण : आता सभाच सभा चोहीकडे … !!

मुंबई : मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या दोन सभानानंतर त्यांनी सर्वच पक्षांना कामाला लावले आहे असेच म्हणावे लागेल. त्यांच्या आधी भाजपकडून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळीकर, किरीट सोमय्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे , त्यांची दोन मुले , शिवसेनेकडून खा. संजय राऊत , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार , नितीन राऊत , बाळासाहेब थोरात , अशोक चव्हाण , राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार , अजित पवार, सुप्रिया सुळे , जितेंद्र आव्हाड, मिटकरी , छगन भुजबळ , तुरुंगात गेलेले नवाब मलिक हे सर्व जण अधून मधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असताना आता राज ठाकरे यांनी सभेचा बॉम्ब फोडल्यानंतर सर्वांनीच सभेचे उत्तर सभेने द्यायचे असेच जणू ठरवले आहे. दरम्यान शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इस्लमपूर आणि कोल्हापूरच्या सभेत बरीच कसर भरून काढली.
दरम्यानच्या काळात आपल्या दोन सभानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांची परतफेड करणार नाहीत ते राज ठाकरे कसले ? त्यांना आता औरंगाबादच्या सभेत आतापर्यंतच्या आरोपांचा हिशेब चुकता करायचा आहे म्हणून त्यांनाही औरंगाबादची निवड केली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आता मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे . त्यांनी जाहीर केल्यानुसार पुढील महिन्यात १४ आणि १५ तारखेला मुंबईतील बीकेसी मैदानावर शिवसेनाच मेळावा पार पडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे आपल्या विरोधकांवर तोफ डागणार आहेत.
भाजप आणि राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाष्य करण्यात आल्यानंतर त्यांना उत्तर देताना , ‘लवकरच मी सभा घेणार आहे. सभेचे पेव फुटले आहे, आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे. नव हिंदू आणि तकलादू , नकली हिंदूत्वादी आले आहेत , तुमचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा आहे, असे म्हणणाऱ्यांचा मला समाचार घ्यायचा आहे. ‘ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना आणि भाजपाला थेट आव्हान दिले आहे.