MaharshtraPoliticalUpdate : मोठी बातमी : राज्यात पुन्हा एकदा राजकीय धुळवड , आता महाविकास आघाडीचीही पुण्यात सभा

पुणे : पाडव्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या पहिल्या सभेनंतर पुन्हा उत्तर सभा घेत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. दरम्यान औरंगाबादेत तिसऱ्या सभेच्या आयोजनाची घोषणा केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्षांनी ३० एप्रिलला पुण्यातील अलका टॉकिज चौकात जाहीर सभेची घोषणा केली आहे त्यामुळे हि सभा होणार असेल तर राज ठाकरे यांच्या सभेलाही पोलिसांना परवानगी द्यावी लागणार हे निश्चित आहे. अर्थात या दोन्हीही सभांच्या निमित्ताने राज्यात पुन्हा एकदा राजकीय धुळवड उडणार हे मात्र नक्की.
पाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत महाविकास आघाडीला टार्गेट करीत खासकरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला बोल केला होता. या सभेत खासकरून राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच हल्ला बोल केला होता ज्याचे उत्तर नाही नाही म्हणता शरद पवार यांनाही द्यावे लागले. दरम्यान पवारांसहित राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्यावर नकली आणि नवं हिंदुत्ववादी म्हणून टीका केली होती.
या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी राज ठाकरे यांची ‘खाज ठाकरे ‘ म्हणून तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘अर्धवटराव ‘ म्हणून खिल्ली उडविली होती त्याला मनसेनेत्यांनी जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता ते राज ठाकरे यांनी खा. राऊत यांच्यावर टीका करताना ” मी लवंडयावर बोलत नाही ” म्हणून उत्तर देणे टाळले होते. आता तर ३० एप्रिल रोजी जर महाविकास आघाडीची सभा झाली तर या सर्वांचा हिशेब राज ठाकरे १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादच्या सभेत चुकता करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेची चर्चा जोरात सुरु असली तरी त्यांच्या सभेला अद्यापही पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही मनसेकडून सभेची जय्यत तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे सभेआधी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत. तिथे राज ठाकरे यांच्या सभेबाबत नियोजन होणार आहे. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचंही नियोजन केले जाणार आहे. राज ठाकरे जेव्हा पुण्याहून औरंगाबादला जाणार तेव्हा १५० ते २०० गाड्यांचा ताफा असणार आहे. याशिवाय एक लाख नागरिक सभेत असणार असल्याचा दावा केला जात आहे.