MaharashtraPoliticalUpdate : मनसेची औरंगाबादची सभा आणि राज ठाकरे यांच्यावर आठवले यांनी केली कठोर शब्दात टीका…

पुणे : औरंगाबाद येथे १ मे रोजी राज ठाकरे घोषित जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी रिपब्लीकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. याच पत्रकार परिषदेत राज्यामध्ये सुरु असणाऱ्या भोंग्यांसंदर्भातील राजकारणावरुन पक्षाची बाजू पुन्हा अधोरेखित करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली.
यावेळी बोलताना आठवले म्हणाले कि , सध्या महाराष्ट्रात भोंग्याचा विषय सुरू आहे. मशिदींवर अनेक वर्षे भोंगे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी भोंग्याला विरोध केला नाही. पण राज ठाकरे यांनी भगवे घालून भोंग्याला विरोध करू नये. आमचा भोंगे काढण्यास विरोध आहे. राज ठाकरे यांनी केलेला विरोध चुकीचा आहे. समाज अल्पसंख्याक आहे. धमकीची भाषा कोणी करू नये.
दरम्यान ३ मेला जर कोणी मशीदींवरील भोंगे काढायला आले तर माझे कार्यकर्ते मशीदींचे संरक्षण करतील. आम्हीही दादागिरी करू शकतो, आम्हाला पण दादागिरी करता येते, हे लक्षात घ्यावे . पोलिसांनी यात लक्ष घालण गरजेच आहे. मुस्लिम नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे. अजान थोड्या वेळाची असते. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे,” राज ठाकरे यांनी आपल्या झेंड्याचा रंग भगवा झेंडा केला याचा आनंद आहे पण त्यांना भगवाच हवा होता तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती अशी टोलेबाजी करताना, शिवसेना कार्यप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांचे नाव सूचवले होत, पण परत त्यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीकाही आठवले यांनी केली.
भोंग्याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे…
आम्ही भाजपसोबत असलो तरी भोंग्यांबाबत भाजपाने काय भूमिका घेतली माहिती नाही. पण माझी अन् माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली आहे. समाजात शांतता राखवी हा आमचा प्रयत्न आहे,” असे स्पष्ट करताना आठवले म्हणाले कि , “मनसे आरपीआयची जागा भाजपामध्ये घेणार नाही. राज ठाकरेंना सोबत घेतले तर मतदार नाराज होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपाने सोबत घेऊ नये, असे माझे मत आहे. आमचे अस्तित्व संपणार नाही,” दरम्यान “राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये. तिकडे मुस्लिम समाज जास्त आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. म्हणून सभेला परवानगी दिली तर राज ठाकरे राज्यात वाद निर्माण करत फिरतील. समाजात वाद निर्माण होत असेल तर राज्य सरकारने लक्ष घातले पाहिजे,” असेही आठवले म्हणालेत