NawabmalikNewsUpdate : नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

नवी दिल्ली : ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना हा एक मोठा झटका बसला आहे. ईडीने आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हणत नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचा निर्वाळा देत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
दरम्यान मागील महिन्यात १५मार्च रोजी मुंबई हायकोर्टानेही नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली होती.
नवाब मलिक यांना मोठा झटका
नवाब मलिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात काही तथ्य नाही मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. मात्र, ही याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा याचिका फेटाळून लावल्याने नवाब मलिक यांना एक मोठा झटका बसला आहे.
नवाब मलिक यांच्या संपत्तीचा लेख जोखा
नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने 13 एप्रिल रोजी मोठी कारवाई केली. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली. यामध्ये मुंबईतील महत्त्वाची संपत्ती आणि उस्मानाबादेतील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने संबंधित कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने नवाब मलिकांचे मुंबईतील पाच फ्लॅटवर जप्ती आणली आहे. यातील तीन फ्लॅट हे कुर्ला तर दोन फ्लॅट हे वांद्रे परिसरातील आहेत. ईडीने नवाब मलिक यांची उस्मानाबाद येथील १४८ एकर शेतजमीनही ताब्यात घेतली आहे.
दरम्यान ईडीने मलिकांच्या एकूण ९ मालमत्तांवर टाच मारली आहे. ईडीची अद्यापही चौकशी सुरु आहे. पण ईडीने मलिकांच्या संपत्तीवर आणलेली जप्ती ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि एनआयएकडून सुरु आहे. तसेच नवाब मलिकही सध्या अटकेत आहेत.