MaharashtraPoliticalUpdate : मार्चपर्यंत सरकार पडले नाही , आता नारायण राणे यांनी दिली नवीन डेडलाईन…

वाशीम : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन आधीच वर्षे उलटली असली तरी भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे शत्रुत्व संपता संपणार नाही असेच दिसत आहे. त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं भाकीत वर्तवले आहे. विशेष म्हणजे हे सरकार कधीपर्यंत पडेल याची डेडलाईनही दिली आहे.
“आमच्याकडे कोकणात मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला वादळ येतं. त्यात हलणारी झाडं फांद्यांसकट कोसळून पडतात. हे तीन पक्षांचं एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत, मुख्य खोडावर नाहीत. ते जून महिन्याच्या अगोदर जाणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र…” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. या अगोदर राणेंनी मार्चपर्यंत सरकार पडेल असे म्हटलं होते.
नारायण राणे आज वॉशिंच्या दौऱ्यावर होते . यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले हे भाकीत केले. यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. “सामना आणि संजय राऊत याबद्दल काही प्रश्न विचारू नका. त्यांना मी पत्रकार मानत नाही, संपादक तर नाहीच नाही. तुम्ही त्यांची भाषा, वैचारिकता बघा. मागील एका पत्रकारपरिषदेत त्यांनी घाणेरड्या शिव्या दिल्या.
असा पत्रकार आणि असं सामनात छापून येतं. त्याला बोलायला काही जागा आहे का?, ईडीने त्याची काळ्या पैशांनी घेतलेली मालमत्ता जप्त केली. त्या माणसाला लोकांना शिकवायला नैतिकता कुठे राहते?, त्यामुळे संजय राऊतचा कुठला प्रश्न विचारू नका, मी अशा माणसला किंमत देत नाही. ज्यावर कारवाई झालेली आहे, मालमत्ता जप्त झाली आहे. आता संपादकाला काय पगार असतो हे तुम्ही पत्रकार असल्याने तुम्हाला माहिती आहे, मग रायगड समुद्र किनारी तुम्ही प्लॉट घेऊ शकता का? मग या प्रगतीचं काय गौडबंगाल आहे हे त्यांनी सांगाव. कसे पैसे मिळवले, ब्लॅकमेलिंग कोणाकोणाला केलं, हे सांगावं.” अशा शब्दांमध्ये नारायण राणे यांनी टीका केली.