DelhiViolenceUpdate : हनुमान जयंती हिंसाचार : जहांगीरपुरी भागात नेमके काय घडले ? १४ जणांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीतील हनुमान जयंती हिंसाचार दरम्यान शनिवारी जहांगीरपुरी भागात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजता झालेल्या हिंसाचारात दगडफेक झाली आणि काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जहांगीरपुरी आणि इतर संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी अधिकार्यांशी बोलून हिंसाचार करणार्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेचा तपास विशेष कक्षामार्फत करण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. सर्व पक्षांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचारात सहभागी 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे शनिवारी झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी दंगल, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत आतापर्यंत आठ पोलिसांसह एकूण 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये दिल्ली पोलिस उपनिरीक्षक मेधालाल मीना यांचाही समावेश असून त्यांच्या हाताला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबार करणाऱ्या अस्लम नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.
या भागातून रॅली पहिल्यांदाच निघाली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रॅली एका मशिदीजवळून जात असताना अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अन्सार याने रॅलीतील सहभागींसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून वाद वाढला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. स्थानिक रहिवासी नूरजहाँ यांनी सांगितले की, या भागात हिंदू धार्मिक रॅलीत हिंसाचार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मशिदीतून हिंसाचार सुरू झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. रॅलीत सहभागी असलेल्या राकेशने सांगितले की, जेव्हा दगडफेक सुरू झाली तेव्हा ते शांततेने पुढे जात होते.
संशयितांचे अटकसत्र सुरु
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली आहे. हिंसाचार पाहता आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावरील सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओंचा वापर करून आणखी संशयितांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपासासाठी क्राइम ब्रँच आणि स्पेशल सेलची 10 टीम तयार करण्यात आली आहे.
दंगलखोरांवर कडक कारवाईचा इशारा
दरम्यान दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दंगलखोरांवर कडक कारवाईचा इशारा दिला असून नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन केले आहे. रविवारी सकाळी हिंसाचारग्रस्त जहांगीरपुरी भागाला भेट देणारे उत्तर-पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार हंसराज हंस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या संपूर्ण प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल म्हणाले की, उपराज्यपालांनी त्यांना आश्वासन दिले आहे की शांतता सुनिश्चित करण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत आणि दोषींना सोडले जाणार नाही.
या घटनेवरून राजकारणही सुरू झाले आहे. कपिल मिश्रा आणि भाजपच्या दिल्ली युनिटचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांनी आरोप केला की या भागात राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचा हात आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार मनोज तिवारी यांनी असा दावा केला आहे की “हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे ज्याची त्वरित चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे”.