SataraNewsUpdate : संभाजीराजे आणि उदयनराजे अवमान प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणात अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर मुंबईहून ताब्यात घेऊन सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टात हजर केले होते. सातारा पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या एका गुन्ह्यात सदावर्ते यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान युवराज छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर सरकारी वकिल अंजुम पठाण यांनी विरोध केला. वंश भेद, जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडवन्याचा प्रयत्न सदावर्ते यांच्या कडून होत आहे असा युक्तीवाद न्यायालयात सरकारी वकिलांकडून करण्यात आला. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी म्हटले कि , काहीच रिकव्हरी नाही…सदावर्ते प्रतिष्ठित वकिल… पोलिसांनी दिलेल्या नोटीसीला दिनांक नाही त्यामुळे सातारा पोलिसांनी केलेली अटक ही कायदेशीर प्रक्रियेने केलेली नाही. दरम्यान वृत्त वाहिनीच्या चर्चा सत्रात केलेले वक्तव्य हे कोणाच्या सांगण्यावरून केले आहे? त्याची चौकशी करणे आणि आवाजाची तपासणी यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली.
सरकारी वकिलाच्या युक्तिवादानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी म्हटले कि , सरकारकडून हे प्रकरण रंगवून पुढे आणले जात आहे. यात राजकीय हस्तक्षेप आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर दीड वर्षाने कारवाई का? सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. याचे उत्तर देताना तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले की, कोरोना काळामुळे दीड वर्ष त्यांना आम्ही अटक करू शकलो नाही. या युक्तीवादानंतर सातारा कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.