SataraNewsUpdate : गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात , पोलीस ठाण्यात जाताच दिल्या घोषणा…

सातारा : मुंबई पोलिसांच्या ताब्यातून न्यायालयाने आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांच्या हवाली केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबईच्या गिरगाव कोर्टाने त्यांना याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर सातारा पोलिसांनी गिरगाव कोर्टात दाखल होत सदावर्तेंचा ताबा मागितला होता.
दरम्यान सातारा पोलिसांची मागणी मान्य करीत कोर्टाने सातारा पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा देण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर सातारा पोलीस सदावर्ते यांना मुंबईच्या कारागृहातून आज साताऱ्यात घेऊन आले. यावेळी सातारा पोलीस ठाण्याबाहेर आज संध्याकाळी दाखल झाल्यानंतर सदावर्ते यांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. सदावर्ते यांना सातारा पोलीस ठाण्यात आणल्याचे समजताच मराठा समन्वयकांनीही पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. छत्रपती घरण्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे आणि कोणी असे शब्द वापरतील तर त्यांच्या विरोधात मराठा समाज पेटून उठेल, असा इशाराच यावेळी मराठा समन्वयकांनी दिला.
सदावर्ते यांच्या अटकेची कागदोपत्री कारवाई पूर्ण झालेली असून त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी सातारा शहर पोलीस ठाण्यातच करण्यात आली. शासकीय डॉक्टरांच्या टीमने गुणरत्न सदावर्तेंची वैद्यकीय तपासणी केली. त्यांना उद्या सातारा कोर्टात हजर केले जाणार आहे.