MumbaiNewsUpdate : ‘सिल्व्हर ओक’ आंदोलन प्रकरण : गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पोलिसांकडून तपासणी तर पोलीस निरीक्षकांचे निलंबन

मुंबई : शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’ बंगल्यावरील आंदोलन प्रकरणात अटकेत असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आज पोलिसांनी तपासणी केल्याचे वृत्त आहे. उद्या गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपत आहे. त्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांच्या घराची तपासणी केली. दुपारच्या सुमारास मुंबई पोलिसांचे पथक सदावर्ते यांच्या घरी दाखल झाले आणि कागदपत्रांची छाननी केली. ही तपासणी रात्री नऊपर्यंत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याच प्रकरणात गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांना निलंबित करण्यात आले असल्याचेही वृत्त आहे. त्यांच्या आधी या विभागाचे डीसीपी योगेशकुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
या तपासणीत सीसीटीव्ही फुटेज, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नोंदीचे रजिस्टर तपासण्यात येत असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आले होते याची माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत.न्यूज १८ लोकमतच्या वृत्तानुसार सदावर्ते यांच्या पाठीमागे इतर कुणी व्यक्ती किंवा राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्याच अॅँगलने तपास मुंबई पोलीस करत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सदावर्ते यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांकडून पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी पोलिसांकडून आणखी काही ठोस पुरावे गोळा करत असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’ बंगल्यावरील आंदोलन प्रकरणात जबाबदार धरून एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ८ एप्रिल रोजी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर अटकेची कारवाई केली. सरकारी कामात अडथळा आणणे , जमावाला भडकवणे, कट रचणे या गुन्ह्या अंतर्गत भादंवि ३५३ आणि १२० बी कलमान्वये वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक करून ९ एप्रिल रोजी त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी पोलीस तपासात आरोपींविरोधात सक्षम पुरावे असल्याचे सांगितल्यामुळे सदावर्ते यांचा जामीन अर्ज किला कोर्टाने फेटाळून लावत त्यांना वरच्या कोर्टात जामीन अर्ज करण्याकरता परवानगी दिली आहे. दरम्यान ‘सिल्व्हर ओक’वर आंदोलन करणाऱ्या १०९ एसटी कर्मचाऱ्यांना मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांच्यावर निलंबनाची कारवाई
दरम्यान याच प्रकरणात गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांची उचलबांगडी करीत ऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या आधी या प्रकरणाला जबाबदार धरून झोन दोनचे डीसीपी योगेश कुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांवर हि कारवाई करण्यात आली आहे. महाविकास आघाडीशी संबंधित शरद पवार यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीच्या घरावर इतक्या मोठ्या संख्येने जमाव जमतो आणि हल्ला करण्यात येतो हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणा, पोलीस यांचं फेल्युअर असल्याची टीका होत आहे. ज्या ठिकाणी हल्ला होतो त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पोहोचतात मग पोलीस का नाही पोहोचू शकत असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकरणाची विषावस नगरे पाटील चौकशी करीत आहेत.