CoronaNewsUpdate : हलक्यात घेऊ नका , काही राज्यात वाढतो आहे कोरोना …

नवी दिल्ली : राज्यात आणि देशभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी , दिल्ली, हरियाणा आणि गुजरात या राज्यांत मागील एक आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत सरासरी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. ही संख्या मागील दोन वर्षातील सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत देशात 1054 कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 बाधितांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने केरळ, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोरम येथील राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. यात आरोग्य सचिव यांनी राज्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, जिथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे तिथे नियमित लक्ष ठेवावे.
कोरोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीत शनिवारी कोरोनाच्या 160 रुग्णांची नोंद झाली तर पॉझिटिव्हीटी दर 1.55 टक्के इतका झाला आहे. एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे. तरी दिल्लीत रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहेत. इथे शुक्रवारी 146 रुग्णांची नोंद झाली होती. तर पॉझिटिव्हीटी दर हा 1.39 इतका होता. तर गुरुवारी दिल्लीत 176 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जी आधीच्या दिवसाच्या तुलनेत 40 टक्के जास्त होती. याच दिवशी पॉझिटिव्हीटी दर हा 1.68 इतका होता. यादरम्यान, कुणाचाही मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब होती. तर बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता तसेच 126 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दिल्लीत आतापर्यंत 18,66,102 इतक्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 26,156 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातमध्येही वाढतो आहे धोका
गुजरातमध्ये शनिवारी कोरोनाच्या 34 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. ही मागील तीन आठवड्यातील सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. गुरुवारी तर फक्त 8 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. शनिवारी ही संख्या वाढली. 13 मार्चनंतर सर्वात जास्त रुग्ण शनिवारीच आढळले. यामुळे आठवड्याची सरासरी 15 झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 12,24,025 इतकी झाली आहे.
हरियाणाही वाढतेय रुग्णसंख्या
हरियाणात गेल्या दहा दिवसांत दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ पाहायला मिळत आहे. गुरुग्रामध्ये 270 कोरोनाबाधित आहेत. फरिदाबादमध्ये 34 तर सोनीपत मध्ये 8 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 30 मार्चला इथे 41 रुग्ण आढळले होते तर अॅक्टिव्ह रुग्ण हे 290 होते. तर शनिवारी 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून 363 इतकी झाली आहे.