MumbaiCurrentUpdate : ताजी बातमी : ‘सिल्व्हर ओक ‘ बंगला आंदोलन : गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी …

मुंबई : मुंबई पोलिसांनी सिल्व्हर ओक बंगल्यावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जबाबदार धरीत अटक केलेले आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्तें यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर करीत १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. परंतु न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सदावर्ते यांना किला कोर्टात आणण्यात आले होते. सदावर्ते यांच्याबरोबरच पोलिसांनी १०९ आंदोलनकर्त्यांनाही पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयात दोन्हीही पक्षांच्या युक्तिवादानंतर दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिले. दरम्यान न्यायालयात सदावर्ते यांनी पोलिसांनी रात्री आपल्याशी दुर्व्याव्हार केल्याचा आरोप केला तेंव्हा न्यायाधीशांनी त्यांच्या अंगावर काही जखमा आहेत का ? याची स्वतः शहानिशा केली.
दुपारची बातमी….
काल रात्री आणि आजही गुणरत्न सदावर्ते यांनी, माझी हत्या होऊ शकते असे पोलिसांच्या गाडीतून जाताना मीडिया प्रतिनिधींना उद्देशून म्हटले आहे. सदावर्ते यांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून इतर १०९ आरोपींचा युक्तिवाद चालू आहे.
एसटी आंदोलकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर केलेल्या उग्र आंदोलनानंतर राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईत महाविकास आघडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. काही वेळापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील यांनीही सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओकवरून बाहेर पडल्यानंतर दिलीप वळसे-पाटील तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. काही वेळापूर्वीच वळसे-पाटील वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. सध्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हेदेखील उपस्थित आहेत.
कोणालाही थांगपत्ता न लागून देता आंदोलकांचा जमाव शरद पवार यांच्या घरापर्यंत पोहोचलाच कसा,हा पोलिसांसाठी कळीचा मुद्दा झाला आहे. हा प्रकार म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाविकास आघाडीतील नेतेही करीत आहेत. त्यामुळे राज्याचे गृहखाते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
पोलिसांच्या एफआयआर मध्ये उघडकीस आल्या अनेक गोष्टी
दरम्यान सिल्व्हर ओक राडा प्रकरणात आंदोलकांविरुद्ध दाखल करण्यात एफआयआर मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आंदोलनाच्या आदल्या दिवशीच गुणरत्न सदावर्ते याने चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. त्यानुसार एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरी दुपारी ३ वाजताच पोहोचणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती पण पोलीस वेळेवर पोहोचू शकले नाही, असे पोलीस एफआयआरमध्ये उघड झाले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार ७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसेच प्रसार माध्यमांशी बोलत असतानाही “शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार” असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता असा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रतिक्रियेला प्रेरीत होवून आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला होता. दुपारी ३ वाजताच आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना अर्धा तास आधी मिळाली होती. तरी देखील पोलीस वेळेवर पोहचू शकले नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला आझाद मैदानावर रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीत बारामती आणि सिल्व्हर ओक येथे जाण्याबाबत चर्चा झाली होती. याकरता काही जणांवर जबाबदारी देखील दिली गेली होती. या मुद्दांचा आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक म्हणजे, ८ तारखेला दुपारी ३ वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत हे पोलिसांना कळाले होते. पण ७ तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा उल्लेख केला होता. तेव्हाच आझाद मैदान येथे जे पोलिस उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती तरी देखील शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला गेला नाही त्यामुळे पोलिसांवर टीका होत आहे.