MumbaiNewsUpdate : आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना सीएसटीएमवरूनही हुसकावले , पोलिसांनी आझाद मैदान केले रिकामे ….

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने निकाल लावल्यानंतरही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपलेले नाही. या आंदोलकांनी काल शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर धडक मारल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांच्या गाफीलपणावरही टीका केली जात असून या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी विश्वास नांगरेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना काल मध्यरात्री आझाद मैदानातून बाहेर काढून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नेऊन सोडले होते. मात्र स्थानकावर ठिय्या देऊन बसलेल्या एसटी आंदोलकांना आता येथूनही रेल्वे पोलिसांनी बाहेर काढण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे काल रात्री पोलिसांनी आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्याची माहिती दिली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजार केले जाणार आहे.
सीएसटीम मधूनही रेल्वे पोलिसांची आंदोलकांवर बाहेर काढण्याची कारवाई
पोलिसांनी एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावल्यानंतर पहाटे पाचपासून आंदोलक सीएसएमटी स्थानकावर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, आता रेल्वे पोलीस आणि टीसींनी आंदोलकांना तिकीटाबद्दल विचारणा करून त्यांना बाहेर काढले आहे. दरम्यान या कारवाईला आंदोलकांनी रेल्वे पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे आंदोलकांना अखेर सीएसएमटी स्थानक सोडावे लागले आहे. आता एसटी आंदोलक पर्यायी जागेच्या शोधात आहेत. सध्या सीएसएमटी स्थानकाबाहेर एसटी आंदोलकांची मोठी गर्दी जमली असून आंदोलक संतप्त झाले आहेत.
एका कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
पोलिसांनी आझाद मैदान रिकामे केल्यानंतर आणखी एका वृत्तानुसार सायन हॉस्पिटलमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परळच्या एसटी डेपोजवळ या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. तर आझाद मैदानातून चार कर्मचारी बेपत्ता असल्याचा आरोप काही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. महेश लोले असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. महेश लोले एसटी कंडक्टर होते. परळ एसटी आगारजवळ लोले यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की नाही, याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही. दरम्यान आंदोलन करणारे ४ एसटी कर्मचारी हे गायब असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामध्ये ताजुद्दीन खान,गोरे काका बच्चाव आणि एक कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडियाला माहित झाले पोलिसांना का नाही : अजित पवार , देवेंद्र फडणवीस
दरम्यान सिल्व्हर ओक बंगल्यावरील आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना जी गोष्ट मीडियाला माहित झाली आणि कॅमेरे ‘सिल्व्हर ओक’ कडे ‘गेले त्याची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवार म्हणाले कि , दोन दिवसांपूर्वी हायकोर्टाने निकाल दिला. त्यानंतर आझाद मैदानावर गुलाल उधळला गेला, मिठाई वाटली गेली. खूप मोठं यश मिळालं असं दाखवण्यात आलं. एवढं सगळं करत असताना सिल्व्हर ओकवर जाण्याचे काहीच कारण नव्हते. याच्या मागचा अर्थ काय, येतो. एकाने तिथे भाषण केलं होतं की १२ तारखेला बारामतीला जाणार आहे.
पोलीस यंत्रणेचे अपयश
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणात पोलीस यंत्रणेला धारेवर धरले आहे. कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले कि , शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. परंतु, ही घटना म्हणजे पोलीस यंत्रणेचे मोठे अपयश आहे. मी कालच या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात असा हल्ला होणे योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातील मुद्दे योग्य व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत. सरकारनेही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. मात्र, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा निषेधार्ह होता. मात्र, या घटनेमुळे एक वेगळाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
एसटी आंदोलक शरद पवार यांच्या घरावर जाणार, हे संपूर्ण मीडियाला माहिती होते. सगळ्यांना अडीच वाजताच मेसेज आले होते. मात्र, पोलिसांना याची कल्पना नव्हती. सिल्व्हर ओकवर प्रसारमाध्यमं पोहोचली, मग पोलीस कुठे होते? एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करू जातात आणि पोलिसांना काहीही माहिती नसते. हे दृश्य भयावह होते. हे सर्व सुरु असताना पोलीस काय करत होते? हे पोलीस यंत्रणेचे मोठे अपयश आहे. या हल्ल्याप्रमाणेच पोलीस यंत्रणेच्या अपयशाचीही चौकशी झाली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
सदावर्तेंवर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती : विजय वडेट्टीवार
दरम्यान आंदोलनामागे कोण? हा तपासाचा भाग असला तरी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाई करायला हवी होती या कारवाईला सरकारकडून विलंब –
सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांना भडकावलं , एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान केलं अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. काल घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत खा. शरद पवार यांच्या भेटीसाठी आज ‘सिल्व्हर ओक’ वर दाखल झाले आहेत.