WorldNewsUpdate : RussiaUkraineWar : युक्रेनकडून रशियावर प्रतिहल्ले , तेलसाठा डेपोवर डागली क्षेपणास्त्रे…

कीव्ह : रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आता युक्रेनचे लष्करही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. युक्रेनने या आठवड्यात पश्चिम रशियातील इंधन साठवण डेपोवर हल्ला केला. कीवमधून रशियाच्या भूमीवर झालेला हा पहिलाच हवाई हल्ला असल्याचे मानले जात आहे. व्हिडिओमध्ये, युक्रेनियन हेलिकॉप्टर रशियाच्या बेलग्रेडमधील इंधन साठवण डेपोवर क्षेपणास्त्रे डागताना दिसत आहेत आणि त्यानंतर स्फोट झाला आहे. Mi-24 हेलिकॉप्टरने हा हल्ला केला.
दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रशियाने युक्रेनने आपल्या भूभागावर हवाई हल्ले केल्याचा अहवाल दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी-शुक्रवारी मध्यरात्री या विमानांनी रशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि हल्ला केला. डेपोच्या सुरक्षा कॅमेरा फुटेजमध्ये प्रकाश पुढे सरकताना, आकाशात कमी उंचीवरून डागलेले क्षेपणास्त्र आणि त्यानंतर जमिनीवर स्फोट झाल्याचे दाखवले आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना बेलग्रेड प्रदेशाचे राज्यपाल, वेचेस्लाव ग्लॅडकोव्ह यांनी एका टेलीग्राम संदेशात लिहिले आहे कि , “युक्रेनियन सैन्याच्या दोन हेलिकॉप्टरने केलेल्या हवाई हल्ल्यात पेट्रोल डेपोमध्ये आग लागली.” या हल्ल्यात इंधन साठवणूक डेपोतील दोन कर्मचारी जखमी झाले. युक्रेनच्या खार्किव शहरापासून बेलग्रेड सुमारे 80 किमी आहे. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर खार्किवमध्ये रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस केला आहे. बेलग्रेडने पूर्व युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन सैन्यासाठी लॉजिस्टिक हब म्हणून काम केले आहे.
सैनिकांना लक्षणीय प्रमाणावर किरणोत्सर्ग
दरम्यान मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग असलेला चेर्नोबिल अणु प्रकल्पाचा परिसर रशियन सैनिकांनी शुक्रवारी सकाळी सोडला असून या परिसराचे नियंत्रण युक्रेनकडे देण्यात आले आहे. त्याच वेळी युक्रेनने पूर्वेकडील भागात नव्याने हल्ले सुरू केले आहेत, तर रशियन लष्कराने पुन्हा एकदा मारियुपोल शहराकडे येणारी मदत रोखली आहे. सैनिकांना लक्षणीय प्रमाणावर किरणोत्सर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर रशियन लष्कराने चेर्नोबिल अणुप्रकल्प परिसर सोडला आहे, असे ‘ एनरगोटम ’ या युक्रेनच्या सरकारी ऊर्जा कंपनीने सांगितले. प्रकल्पानजीकच्या जंगलात लपण्यासाठी चर खोदताना रशियन सैनिकांना किरणोत्सर्ग झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याला दुजोरा मिळालेला नाही.
रशियाकडून हवाई व क्षेपणास्त्र हल्ले सुरूच : झेलेन्स्की
युक्रेनी लष्कराने स्लोबोदा आणि लुकाशिवका ही दोन गावे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. कीव्हच्या मदतीचा पुरवठा केला जाणाऱ्या मार्गावरील ही गावे आहेत, असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. कीव्ह शहराच्या पूर्वेकडील, तसेच ईशान्येकडील भागात युक्रेनने यशस्वी प्रतिहल्ले केल्याचेही ब्रिटनने म्हटले आहे. चेर्निहिव्ह आणि कीव्ह या शहरांमधील लष्करी कारवाया कमी केल्याचे रशियाने म्हटले असले तरी या शहरांमध्ये हवाई व क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. युक्रेनच्या उत्तर व मध्य भागातून रशियाने सैनिकांना माघारी बोलावणे ही केवळ लष्करी क्लृप्ती आहे. आम्हाला त्यांचा हेतु माहिती आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाची युक्रेनला चिलखती वाहनांची मोठी मदत
ऑस्ट्रेलिया ‘बुशमास्टर’ चिलखती वाहने युक्रेनला पाठवणार आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या विनंतीवरून ही वाहने युक्रेनला पाठवली जाणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले. मात्र, ही किती वाहने देण्यात येतील, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. ऑस्ट्रेलियाने युक्रेनला अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन झेलेन्स्की यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसद सदस्यांना गुरुवारी केले होते. ऑस्ट्रेलियाने सहा कोटी ८० लाख डॉलरचे लष्करी साह्य, चार कोटी ९० लाख डॉलर मानवतेच्या दृष्टीने मदत युक्रेनला देणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया युक्रेनला ७० हजार टन कोळसाही देणार आहे.