MaharashtraPoliticalUpdate : राष्ट्रवादी काँग्रेसनेच जातीयवाद वाढवल्याचा राज ठाकरे यांचा पुनरुच्चार , उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्त शिवाजी पार्कवर आयोजित जाहीर सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला . महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा पुनरोच्चारही त्यांनी यावेळी बोलताना केला. १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे मत त्यांनी यावेळी पुन्हा एकदा मांडले. नेहमीप्रमाणे त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. शेवटी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती १४ एप्रिल धुमधडाक्यात साजरी करण्याचे आवाहन केले आणि सभा संपली.
आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले कि , “काही लोकांना ही गोष्ट हवी आहे, काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. याआधी जात नव्हती का? होती, पण त्याआधी जातीचा अभिमान होता. मात्र, १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा यांनी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
बाबासाहेब पुरंदरे यांची पाठराखण
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे यांची पाठराखण केली ते म्हणाले कि , “तो त्या जातीचा हा या जातीचा असं म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार. कोण तो जेम्स लेन ? होता कुठे आणि आज कुठे आहे ? याची काही माहिती आहे का ? तो काय बर्नोड शॉ आहे का ? ” “आम्ही इतिहास वाचतच नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जातपात गाडून स्वराज्यासाठी एक व्हा त्या महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत, राजकारण सुरू आहेत. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?” असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
शिवसेनेवर जोरदार हल्ला
दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्ष कधी ठरलं ? असा जाब विचारत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून मतदारांशी गद्दारी केल्याचा आरोप केला. तसेच मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना काय शासन देणार? असा प्रश्न विचारला. निकाल लागल्यानंतर खास करून उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. ते म्हणाले अडीच अडीच वर्षे ठरली होती. मग महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा ते कधी बोलले का नाहीत. इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हाही बोलला नाहीत. मोदी-शहा हे दोघे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. तेव्हा हे का बोलले नाहीत? जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकतं हे लक्षात आलं. तेव्हा अडीच वर्षाचा विषय काढला. त्यानंतर एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच. सालं पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणाबरोबर केलं हेच समजेना,” असं म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगावर हल्ला चढवला.
“अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा”
“माझ्या कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा असं मुख्यमंत्री म्हणालेत, मग पहिल्यांदा त्यांना सांगा की मुंबई महानगर पालिकेत ये जा करू नका… मला ईडीची नोटीस आली मी गेलो ना चौकशीला, अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा. हे सगळं २०१९ चं आहे, या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका,” असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं. यावेळी बोलताना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचाही उल्लेख केला. राज्य सरकारने केलेली आमदारांना घरे देण्याची घोषणा आणि आमदारांच्या पेन्शनलाही त्यांनी आपला विरोध असल्याचे सांगितले.
मशिदीवरच्या भोंग्यावरून ठाकरे म्हणाले तर हनुमान चालीसा सुरु करा …
“ माझा प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा. माझी पंतप्रधानांना विनंती आहे की झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. पोलिसांना देखील माहिती आहे. तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही, या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील,” असेही राज ठाकरे म्हणाले.