WorldNewsUpdate : दुनिया : पंतप्रधान इम्रान खानची बॅटिंग धोक्यात… पाकिस्तानात आज काय घडणार ?

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे जाणे जवळपास निश्चित झाले आहे. आजपासून त्यांच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्याआधी ते काल बुधवारी देशाला संबोधित करणार होते, मात्र लष्करप्रमुख जनरल बाजवा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे संबोधन रद्द केले. दुसरीकडे विरोधी पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन हा देशाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे सांगितले. सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील हि चर्चा तीन दिवस चालेल असे सांगण्यात येत आहे.
दिनांक 28 मार्च रोजी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे, ज्यावर गुरुवार, 31 मार्चपासून चर्चा सुरू होणार असून यावर 3 एप्रिलपर्यंत मतदान होईल, असे मानले जात आहे. सध्या ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यात हे स्पष्टपणे दिसत आहे की, इम्रान यांची पंतप्रधानपदाची बॅटिंग धोक्यात आल्याने या खेळात त्यांची विकेट पडण्याची खात्री आहे. आता प्रश्न पडतो की इम्रान खान यांचे सरकार पाकिस्तानात गेले तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल.
भारत-पाकिस्तानमधील चर्चेची फेरी पुन्हा सुरू होणार का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ कमर आगा याबाबत एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले की, शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान झाले तर भारताशी चर्चा सुरू होऊ शकते. कारण यावेळी पाकिस्तानच्या लष्कराला आपली भारतीय सीमा सुरक्षित असावी असे वाटते. जेणेकरून आगामी काळात ते अफगाणिस्तानवर लक्ष केंद्रित करू शकतील. त्यांच्यासाठी सध्या काश्मीरपेक्षा अफगाणिस्तान हा मोठा प्रश्न आहे. त्यांना अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता कोणत्याही परिस्थितीत मजबूत करायची आहे. तालिबानची परिस्थिती बिघडत चालली आहे, रोज निदर्शने होत आहेत. त्यांची एकजूट तुटत चालली असून त्यांच्यासाठी सत्ता टिकवणे कठीण होत आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानचे लष्कर अफगाणिस्तानवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. अफगाणिस्तानचे प्रकरण चिघळले की पाकिस्तान भारताशी चर्चेची फेरी सुरू करतो, असे यापूर्वीही दिसून आले आहे. तर या विषयावर पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार नुसरत अमीन यांनी म्हटले आहे कि , ‘भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध आता चेष्टेचे बनले आहेत. गेल्या 73 वर्षात भारतात आणि पाकिस्तानात किती राजकारणी आले आणि गेले हे माहीत नाही. पण दोघांच्या नात्यावर कोणताही तोडगा निघाला नाही.
इम्रानच्या अडचणी का वाढल्या?
एक तर नव्या पाकिस्तानचे आश्वासन देऊन इम्रानखान यांनी सत्ता हस्तगत केली होती. यावेळी त्यांनी देशातील बाकीच्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र ते सत्तेत आल्यानंतर महागाई प्रचंड वाढली. दरम्यानच्या काळात त्यांच्याच पक्षाच्या पीटीआयच्या १३ खासदारांनी बंडखोरीची घोषणा केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत, इम्रान यांच्या पक्षाचे 20 ते 30 खासदार त्यांच्या कारभारावर असंतुष्ट असल्याचे सांगितले जात आहे ज्यामुळे हि नामुष्की त्यांच्यावर आली.
पुढील पंतप्रधान कोण ?
इम्रानखान यांची विकेट पडल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ पंतप्रधान होऊ शकतात असे म्हटले जात आहे. सध्या ते नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते असून पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) चे अध्यक्ष आहेत. गेल्या 4 दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणातील हा मोठा चेहरा असून एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांना ओळखले जाते. पंजाब राज्याचे ते तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले असून पाकिस्तानचे ते एक मोठे उद्योगपतीही आहेत. विशेष म्हणजे मनी लाँड्रिंग प्रकरणात ते तुरुंगातही गेले आहेत