MaharashtraNewsUpdate : राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत झाला निर्णय …

मुंबई : राज्यातील वीज कर्मचारी आणि सरकार यांच्यातील वाटाघाटी यशस्वी झाल्यामुळे गेल्या २ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या संप मागे घेण्यात आला आहे. कर्मचारी संघटनेने याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा केली आहे. वीज कर्मचारी संघर्ष समितीचे मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक चर्चा झाली असून वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही हे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे संप स्थगित करण्यात येत आहे.
या बैठकीनंतर मोहन शर्मा म्हणाले की, ऊर्जामंत्र्यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिले आहे. पुढील ३-४ दिवसांत यावर कारवाई होईल. संपात सहभागी झालेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही. बदली धोरणासंदर्भात एकतर्फी निर्णयावर विस्तृत निवेदन करण्यात येईल. हायड्रोपॉवर स्टेशन खासगी कंपन्यांना देण्याबाबत चर्चा झाली. चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवणार नाही. कंत्राटी कामगारांना संरक्षण दिले जाईल. नोकरी भरतीत कंत्राटी कामगारांना संरक्षण देण्यात येईल. २००३ च्या अमेंडमेंड बील राज्याने केंद्राला कळवले आहे.
दरम्यान ज्या खात्यात सुसंवाद राखला जातो, तेथे कर्मचारी संघटना संप पुकारण्याचा विचार करत नाहीत. राज्यात पुकारण्यात आलेला संप अचानक प्रारंभ झालेला नसून, कर्मचारी संघटनानी दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस दिली होती. पण त्यांच्याशी वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलाही संवाद साधला नाही. आता कर्मचारी रस्त्यावर उतरल्यानंतर ऊर्जा मंत्रालयाला जाग येत असेल तर हे दुर्दैवी आहे अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन राऊत यांच्यावर केली होती.