MaharashtraPoliticalUpdate : रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज मुंबईत आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांची काही दिवसांपूर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने रुपाली चाकणकर यांनी एक व्यक्ती एक पद यानुसार राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर या पदाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांना देण्यात आली. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांना बढती मिळाली होती. रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे कि , 27 जुलै 2019 रोजी मला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार मिळाला. जुलै महिन्यात पदभार स्वीकारला आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पूर स्थिती होती. त्याच काळात अनेक लोक आपल्या पक्षाला सोडून जात होते. पहिल्या आढावा बैठकीत पूरस्थिती होती अशा वेळी महिला आपल्या बैठकीत कशा येणार असा प्रश्न होता. पण आपल्या कार्याचा अनुभव असल्याने मी आढावा बैठक घेतली.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता या पदावर कुणाची नियुक्ती करण्यात येणार? या पदावर कोणाला संधी राष्ट्रवादी देणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची ऑक्टोबर 2021 मध्ये नियुक्ती झाली.
जेव्हा रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड झाल्याची बातमी समोर आली तेव्हाही चित्रा वाघ यांचा चांगलाच तिळपापड झाला. यावरुन चित्रा वाघ यांनी ट्विट करत ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल’ असं वादग्रस्त ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर एकच गोंधळ उडाला होता.