MaharashtraPoliticalUpdate : राज्यपालांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया…

उस्मानाबाद : सध्या राज्यपालांच्या अत्यंत बेजबाबदार वक्तव्याबद्दल राज्यात चर्चा चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर हि बाब जाहीरपणे घातली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही राज्यपालांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नसल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली’ असे सांगत त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी गावातील विविध विकास कामाचे उद्घाटन रविवारी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले कि , ‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल आहे. त्यांनी दोन कार्यक्रमात वक्तव्य केलं. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य नसल्याने त्यांच्याकडून अशी विधानं होतात.
राज्यपालांनी अशी वक्तव्यं केल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे, लोक म्हणतात यांच्या नादाला न लागणे बरे’ असा टोलाही पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला.तसेच, ‘काही लोकांना सत्ता गेल्यापासून करमत नाही निवडणूक निकाल लागण्याआधीच मी येणार मी येणार, असे सांगत होते पण त्यांना आम्ही काय येऊ देतो, अशी मिस्कील टीका पवार यांनी हातवारे करत विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केली. दरम्यान ‘राज्यातील आघाडी सरकार हे देशातील इतर राज्यांपेक्षा चांगले काम करत आहे, असे कौतुकही पवारांनी केले.
दरम्यान ‘नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक यश राष्ट्रवादीला मिळाले आहे. तरी देखील भाजपचा माज काही केल्या उतरत नाही. भल्या भल्याच्या वर ईडीच्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप करत ईडीची किंमत शेतकऱ्याच्या बिडी सारखी झाल्याची टीका केली आहे, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.