RussiaUkraineUpdate : रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या ११ हवाई पट्ट्यांचे मोठे नुकसान , ७० हून अधिक लष्करी तळ नष्ट

नवी दिल्ली : रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या लष्करी तळांचे मोठे नुकसान झाल्याची बातमी आहे. रशियाने दावा केला आहे की त्यांनी युक्रेनमधील ११ हवाई पट्टीसह ७० हून अधिक लष्करी तळ नष्ट केले आहेत. रशियाच्या या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये सुमारे १२ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोकांना घरे सोडून इतरत्र जावे लागले आहे.
रशियाने म्हटले आहे की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील ११ एअरफील्डसह ७० हून अधिक लष्करी तळ नष्ट केले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह म्हणाले की, रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील ७४ लष्करी सुविधा नष्ट झाल्या आहेत. ते म्हणाले की, नष्ट झालेल्या लष्करी तळांमध्ये ११ एअरफील्डचाही समावेश आहे. युक्रेनचे लष्करी हेलिकॉप्टर आणि चार ड्रोनही पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेन संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करू शकतात, असे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदींनी युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीचे अध्यक्षस्थान केले. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह इतर प्रमुख अधिकारी सहभागी आहेत.
तत्पूर्वी, एएफपी या वृत्तसंस्थेने सांगितले की, रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवच्या उत्तरेकडील भागात प्रवेश केला आहे. युक्रेनच्या सीमा रक्षकांनी ही माहिती दिली आहे.
रशियाने युक्रेनचे बंदर शहर ओडेसालाही लक्ष्य केले आहे. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या बद्दल माहिती देताना स्थानिक प्रशासनाने सांगितले की, गुरुवारी ओडेसाजवळील लष्करी तळावर झालेल्या हवाई हल्ल्यात १८ जण ठार झाले. यामध्ये १० महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे.