Sansad TV | संसद टीव्हीचे युट्यूब चॅनेल हॅक

संसद टीव्हीचे युट्यूब चॅनेल हॅक करण्यात अल्याने सध्या कंपनीकडून हे चॅनेल बंद करण्यात आले आहे. याप्रकरणी संसद टीव्हीकडून एक प्रेस रिलीज जारी करण्यात आली असून त्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, युट्यूब अकाउंट हॅकर्सकडून चॅनेल हॅक करण्यात आला आहे. तसेच, युट्यूब ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
संसद टीव्ही च्या माध्यमातून लोकसभा आणि राज्यसभेचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाते. युट्यूबने संसद टीव्ही बाबत म्हटले आहे की, YouTube’s Community Guidelines चे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हॅकर्सने संसद टीव्हीचे युट्यूब चॅनेल हॅक करत त्यांचे नाव बदलून इथरियम केले होते. इथरियम (Ethereum) एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. त्यानंतर चॅनेलच्या सोशल मीडिया टीमने युट्यूब चॅनेल रिकव्हर केले आहे. मात्र, अद्याप संसद टीव्हीचे युट्यूब चॅनेल रिस्टोर झालेले नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गुगलला यासंदर्भात माहिती देऊन याबाबतची तक्रार गुगलकडे करण्यात आली असून, ही समस्या सोडवली जात आहे.
संसद टीव्हीच्या युट्यूब चॅनेलचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, ‘या अकाउंटला युट्यूबच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बंद करण्यात आले आहे.’ मात्र, कोणत्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली याची माहिती देण्यात आलेली नाही. संसद टीव्हीच्या युट्यूब चॅनेलवर गेल्यानंतर ‘हे पेज उपलब्ध नाही. क्षमा असावी.’ असे लिहून येत आहे. तसेच, ४०४ एरॉर देखील दिसत होता.