AurangabadNewsUpdate : कारण राजकारण : औरंगाबादेत खैरे – सत्तार यांच्यात नेमके काय ठरले ?

औरंगाबाद : जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आ. अंबादास दानवे यांनी घेतलेली फारकत आणि जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांच्यामुळे झालेला समर्थकाचा पराभव या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नवी खेळी खेळून औरंगाबादच्या शिवसेनेतील सर्वात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी जवळीक साधली आहे. ही जवळीक साधण्याचा अर्थ सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांच्या आदेशानेच काम सुरु आहे असा असा लावला गेला तेंव्हा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पस्ट केले की, खैरे पक्षातील जेष्ठ नेते आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे एवढाच उद्देश आहे. पण पत्रकारांनी असा प्रश्न आपल्याला विचारलेला आवडले नाही यापुढील सर्व निवडणुका खैरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा करतानाच सत्तार यांनी पुढचे खासदार खैरेच असतील, असे जाहीर करून टाकले आहे.
सत्तार चांगलेच दुखावले
खरे तर सत्तार शिवसेनेत दाखल झाल्यापासून खैरे यांचे सत्तार यांच्याशी कधीच पटले नव्हते. मात्र त्याच खैरे यांनी नुकतेच सत्तार यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढत असल्याची भाषा केली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी सत्तार-भुमरे-दानवे हे शिवसेनेचे आमदार त्रिकुट एकत्र आले होते. त्यावेळीही साऱ्यांनी मिळून खैरे यांना बाजूला ठेवले होते. पण जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी सत्तार आपल्याच माणसाला बसविण्याची शक्यता दिसू लागल्यावर भुमरे-दानवे यांनी सत्तार यांच्यापासून दुरावा निर्माण केला. त्यानंतर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्तार आणि भुमरे एकाच पक्षाचे असूनही त्यांनी उपाध्यक्षपदासाठी वेगवेगळे उमेदवार उभे केले. त्यात सत्तार यांचा उमेदवार पराभूत झाला. तर भुमरे यांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे व काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या साथीने दूध संघाच्या उपाध्यक्षपदी आपल्या समर्थकाला निवडून आणले या मुळे सत्तार चांगलेच दुखावले ही बाब खैरे यांनी ओळखून आश्वासक पाऊले उचलली.
खैरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करण्याचा निर्धार
दूध संघात आपल्या समर्थकाचा पराभव , सत्तार यांच्या जिव्हारी लागलेलाच आहे पार्श्वभूमीवर सत्तार यांनी नवी खेळी खेळत शिवसेनेत दानवे व भुमरेंकडून पक्षांतर्गत विरोध होत असलेल्या खैरे यांच्याशी जवळीक साधली . यासाठी त्यांनी सोयगावातील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त साधला. मंगळवारी पार पडलेल्या या निवडणुकीच्या वेळी सत्तार यांनी खैरे यांना केंद्रस्थानी ठेवले. त्यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार घडवून आणतानाच जाहीर यांची पेढेतुलाही घडवून आणली. शिवाय विजयी मिरवणुकीतही खैरे यांनाही जीपमध्ये फिरवले. या निमित्ताने सत्तार यांनी खैरे यांचे नेतृत्व जाहीरपणे मान्य केले.
खैरेच असतील पुढचे खासदार
यावेळी सत्तार यांनी खैरे यांना पेढा तर खैरे यांनी सत्तार यांना लाडू भरवला. शिवाय ‘यापुढे जिल्ह्यातील सर्व निवडणुका खैरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील अशी घोषणा करतानाच खैरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवण्याचा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला. शिवाय पुढच्या वेळी खैरेच खासदार असतील, असेही सत्तार यांनी स्पष्ट करून टाकले.
खैरेंना शक्तिसंचार
गेल्या चाळीस वर्षात शिवसेनेत एकनिष्ठ राहून खैरे यांनी राजकारणात मोठा पल्ला गाठला होता. मात्र २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीतत्यांना पराभव पत्करावा लागला. त्यातच नंतर त्यांना पक्षात एकटे पाडण्याचा कार्यक्रम सुरु होता. आ. दानवे यांनी शिवसेनेत आदित्य ठाकरेंच्या आदेशाने दमदार पाऊले उचलल्याची चित्रे दिसत होती . तर भुमरे यांनीही मंत्री झाल्यावर खैरे यांना महत्व देणे टाळले हे स्पष्ट्पणे जाणवत होते . शिवाय सत्तार देखील विरोधात असल्याने खैरे शिवसेनेत एकटे पडल्याचे चित्र दिसत होते. मात्र आता भुमरे व दानवेंना त्यांची जागा दाखवण्याच्या निमित्ताने सत्तार यांनी खैरे यांच्याशी जवळीक साधल्याने जिल्ह्याचे राजकारण बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.