Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शरद पवार यांनाही साक्षीचे समन्स

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भीमा-कोरेगाव प्रकरणात नेमण्यात आलेल्या आयोगासमोर साक्ष घेण्यात येणार असून त्यांना तसे समन्स जारी करण्यात आले आहेत. २०१८ मध्ये  १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे हिंसाचार उसळला  होता.   यापार्श्वभूमीवर  शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.


या पूर्वी शरद पवार यांना जुलै मध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते . आता पुन्हा एकदा २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार त्यांच्या साक्षीसाठी बोलावण्यात आले आहे.  चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत. शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचे  विधान केले होते. त्यानंतर या प्रकरणात अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे.

दरम्यान या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी केली होती. हिंसाचार झाला तेव्हा राज्यात भाजपाप्रणीत सरकार सत्तेत होते आणि तेव्हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी केला होता.

भीमा कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ एल्गार परिषदेच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी गावात हिंसाचार झाला होता. काही संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. नंतर जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरुण फेरेरा, वेर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव या नऊ कार्यकर्त्यांना हिंसाचारात अटक करण्यात आली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!