IndiaNewsUpdate : भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर दोषारोप , न्यालयाने निकाल राखून ठेवला

इंदौर : राष्ट्रीय संत भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवून निकाल राखून ठेवला आहे. भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.
दरम्यान इंदोर न्यायालयाने भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी आरोपींना दोषी ठरवलं असलं तरी अद्याप दोषींना अद्याप शिक्षा सुनावलेली नाही. मागील अनेक वर्षांपासून भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर इंदोर न्यायालयाने भय्यू महाराजांचा मुख्य सेवक विनायक, केअर टेकर पलक आणि चालक शरदला दोषी ठरवले आहे. या सुनावणीच्या दरम्यान या तिघांनीही भय्यू महाराजांना आत्महत्येला प्रवृत्त केले असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यांच्याविरोधात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना सध्या दोषी घोषित केले असून शिक्षेबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.
भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर इंदूर पोलिसांनी ३ जणांना अटक केली होती . यात एका तरुणीचाही समावेश होता. तसेच भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांनाही अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून लाखो रुपये उकळले, असा आरोप झाला होता.भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.