IndiaNewsUpdate : प्रजासत्ताक दिनीही विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन , रेल्वेला लावली आग

पाटणा : देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना याच दिवशी बिहारमध्ये रेल्वे भरती परीक्षेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वे पॅसेंजरला आगीच्या हवाली करून या रेल्वेवर तुफान दगडफेक केली. दरम्यान NTPC CBT-1 परीक्षेचा निकाल RRB ने जाहीर केला असून आतापर्यंत 15 क्षेत्रांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यावरून विद्यार्थ्यांमधून हा संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचे हे निकाल सदोष असल्याचा आरोप करत बिहारमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. बिहारच्या सितामाऱ्ही जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे रेल्वे थांबवण्यात आली होती. या आंदोलनादरम्यान अचानक विद्यार्थी आक्रमक झाले त्यामुळे विद्यार्थी आणि पोलिसात वादविवाद सुरु झाला. दरम्यान, या आक्रमक विद्यार्थ्यांनी नालंदा, गया या भागात रेल्वे थांबवल्या तर काही भागात रेल्वेची जाळपोळ केली. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी ट्रेन्स थांबवून ठेवल्या आहेत. अखेरीस या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाने माघार घेऊन रेल्वेच्या एनटीपीसी आणि लेव्हल-1 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले कि , परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने एका टप्प्यात परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन लेव्हल करण्यात आल्या होत्या. आता आम्ही यावर विचार करत आहे. मी विद्यार्थ्यांना आवाहान करतो की, रेल्वे ही सार्वजनिक संपत्ती आहे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. तुमच्या मागणीची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांनी कायदा हातात घेऊ नये. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल. या साठी नेमलेल्या कमिटीने 4 मार्चपर्यंत रिपोर्ट द्यायचा आहे.
दरम्यान रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने एका कमिटीची स्थापना केली आहे. जी कमिटी रेल्वे भरती बोर्डा (आरआरबी) कडून आयोजित केलेल्या परीक्षेतील यशस्वी आणि अयशस्वी विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेणार आहे. ही कमिटी दोघांच्या तक्रारींची दखल रेल्वे मंत्रालयाला एक रिपोर्ट देणार आहे.