MaharashtraPoliticalUpdate : असे आहे सध्याचे नगर पंचायतीचे चित्र, कोण किती पाण्यात ?

मुंबई : राज्यातील 32 जिल्ह्यांच्या 106 नगरपंचायतींमधील 1802 जागांचा निकाल हाती आले असून या आकडेवारीनुसार भाजप हा या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा नंबर लागताना दिसत आहे. आतापर्यंत सर्वाधिक 379 जागा भाजपाला मिळाल्या आहेत. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला 359, शिवसेनेला 297, काँग्रेसला 281 आणि इतर 253 जागांवर विजय मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान महाविकास आघाडीला एकूण 937 जागांवर यश मिळाले आहे. मतमोजणी अद्यापही सुरु आहे. निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
असे आहे सध्याचे चित्र
भाजप – 379
राष्ट्रवादी काँग्रेस – 359
शिवसेना – 297
काँग्रेस – 281
इतर – 253
चित्र मराठवाड्याचे
बीड
बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का समजला जात असून स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेनी बाजी मारली आहे. केज नगरपंचायतमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना पराभव सहन करावा लागला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे भाजपला एक मोठा धक्का समजला जात आहे.
औरंगाबाद – नांदेड
औरंगाबादमध्ये भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांना सोयगावमध्ये शिवसेना नेते अब्दुल सत्तार धक्का दिला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवेसेनेला 17 पैकी तब्बल 9 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंतायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतींचा समावेश आहे. या तीनही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला निर्विवाद विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगाव नगरपंचायतीत काँग्रेसला तब्बल 17 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगावमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आमदार राजेश पवार यांना हा सर्वात मोठा झटका आहे.
नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जिल्ह्यातील तीनही नगर पंचायतीत मुसंडी मारली आहे. काँग्रेसने नायगाव पाठोपाठ अर्धापूर नगरपंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता मिळवली आहे. तर माहूर नगरपंतायतीवरही काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. माहूर नगरपंतायतीत 17 पैकी 6 जागांवर यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागांवर यश मिळाले आहे.
अहमदनगर
भाजपला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून मोठा धक्का बसला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकूण 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय झाला आहे. तसेच एक जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण 12 जागांवरील विजय खिशात घातला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे या नगरपंचयातीत काँग्रेसलाही 3 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे कर्जतच्या नगरपंचायत निवडणुकीच महाविकास आघाडीचा तब्बल 15 जागांवर विजय झाला आहे.