LataMangeshkarHealthUpdate : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर , आठ दिवसांपासून रुग्णालयात

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर गेल्या ८ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना काही दिवस रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या त्या आयसीयू मध्ये असून त्यांना अजून किती दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, याबद्दल काही सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले . त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसल्याचेही रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
लता मंगेशकर यांची भाची रचना शाहने त्यांच्या प्रकृतीबाबत १३ जानेवारीला हेल्थ अपडेट दिली होती. याबद्दल सांगताना रचना शाह म्हणाल्या होत्या की, ‘त्यांची प्रकृती स्थिर आहे परंतु सध्या त्यांना ऑक्सिजनचा आधार देण्यात आला आहे. त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा असे आवाहन देखील रचना शाह यांनी केले होते.
लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून काम करण्यास सुरू केले. त्या वडिलांसोबत संगीत नाटकात अभिनय करत होत्या. यानंतर १३ व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे गायले. भारतरत्न, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके यासारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांनी विविध भारतीय भाषांमध्ये ३० हाजाराहून अधिक गाणी गायली आहेत.