CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनाचे 46,723 तर ओमायक्रॉनचे 86 नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46,723 नव्या रुग्णांची भर झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28,041 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडली आहे.
दरम्यान राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली असून आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 734 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. राज्यात आज 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 49 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 29 हजार 452 व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर 6951 व्यक्ती संस्थात्मकविलगीकरणात आहेत. राज्यात आजपर्यंत 7,11,42,569 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 16 हजार 420 कोरोनाबाधित
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 16 हजार 420 नवे कोरोनाबाधित सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास 5 हजार अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी 14 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या 16 हजार 420 इतकी झाली आहे.
राज्यातील ओमायक्रॉन स्थिती
देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात असून राज्याच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी राज्यात 86 नव्या ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. यापैकी 25 राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, 30 राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि 31 रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट दिले आहेत. आज आढळलेल्या 86 रुग्णांमुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 1367 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत 734 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे शहरातील आहेत. पुण्यात आज 54 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये 21, पिंपरी चिंचवडमध्ये 6, सातारा 3, नाशिक 2 आणि पुणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला आहे.
1367 रुग्णापैकी 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत