CoronaIndiaUpdate : देशभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव , पंतप्रधानांची तातडीची बैठक

नवी दिल्ली : देशात तिसऱ्यांदा वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असून कोरोनाबाधितांच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. देशाच्या संसदेबरोबरच सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, गृहसचिव, कॅबिनेट सचिव यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत .यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी , पुरेशा आरोग्य सुविधांची खात्री करा. कोरोनाचा विषाणू सतत विकसित होत आहे त्यामुळे नित्यनियमाने चाचण्या घ्या. विषाणू बदलत असल्याने लसीकरण, जिनोम सिक्वेन्सिंगसह वेगवेगळ्या औषधांबाबत सतत वैज्ञानिक संशोधन करणे आवश्यक आहे, असे सूचित केले. तसेच प्रत्येक राज्यांमधील कोरोना परिस्थिती, तेथिल सुविधा आणि सार्वजनिक आरोग्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल, असे सांगून त्यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याशी संबंधित मार्गदर्शन करा, असेही सूचित केले.
पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींनी जिल्हा स्तरीय आरोग्य यंत्रणेला बळकट करण्याची सूचना केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व राज्यांशी समन्वय साधण्याची सूचना केली. तसेच लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच ज्या भागांमध्ये किंवा झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत त्या झोनमध्ये लक्ष केंद्रीत करा. तिथे सतत निगराणी ठेवा. तसेच ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्या राज्यांना जी मदत लागेल ती मदत करा, अशीदेखील सूचना पंतप्रधान मोदींनी केली.
संसदेतील ४०० जणांना कोरोना
संसदेत काम करणाऱ्या तब्बल ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. संसदेत कोरोनाचा अशाप्रकारे हाहा:कार उडाल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा सचिवालयातील ६५, लोकसभा सचिवालयातील जवळपास २००, तर संसदेत काम करणारे १३३ कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान संसदेतील कोरोनाच संसर्ग लक्षात घेता नव्या निर्देशांमध्ये राज्यसभा सचिवालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. अप्पर सचिव किंवा कार्यकारी अधिकारी पदापेक्षा खालच्या पदाच्या ५० टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत वर्क फ्रॉम होम काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान अपंग किंवा गर्भवती महिलांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सर्व १३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जावी, असे आदेश जारी केले आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात यावेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जावी, अशा सूचना दिल्या आहेत.