IndiaElectionUpdate : पाच राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर

नवी दिल्ली : अखेर भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील निवडणुकांची घोषणा करून त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावातही योग्य ती काळजी घेऊन या निवडणुका पार पडण्याचा संकल्प निवडणूक आयोगाने केला आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार १० फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार असून १० मार्च रोजी सर्व पाचही राज्यांत मतमोजणी पार पडणार आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पाच राज्याच्या ६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे. यावेळी बोलताना चंद्र म्हणाले कि , आमची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिलं कोविड सुरक्षित निवडणूक, दुसरं मतदारांना कोणत्याही अडचणीविना मतदानाचा अनुभव आणि तिसरं म्हणजे सर्वाधिक मतदानाची टक्केवारी.
या मतदान प्रक्रियेत एकूण १८.३ कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होतील. त्यापैकी ८.५५ कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. सर्वाधिक २९ टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात २४ टक्के, मणिपूरमध्ये १९ टक्के, उत्तराखंड १८ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये ११.४ लाख महिला मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १२५० मतदार असतील. आता एकूण मतदान केंद्र २ लाख १५ हजार ३६८ आहेत. १६२० मतदान केंद्र हे पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांमार्फत सांभाळले जातील. काही मतदान केंद्र दिव्यांग व्यक्तींकडून हाताळले जातील. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर्स अशा आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एकूण ९०० निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.
पहिला टप्पा
सर्व राज्यांमधल्या निवडणुका एकूण ७ टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी १४ जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख २१ जानेवारी, मागे घेण्याची तारीख २७ जानेवारी असेल. तर मतदान १० फेब्रुवारीला होईल.
दुसरा टप्पा
या टप्प्यात ४ राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. २१ जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख २८ जानेवारी, मागे घेण्याची मुदत ३१ जानेवारी तर मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी असेल.
तिसरा टप्पा
या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन २५ जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत ४ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २० फेब्रुवारी असेल.
चौथा टप्पा
या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख २७ जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख ३ जानेवारी, मागे घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख २३ फेब्रुवारी असेल.
पाचवा टप्पा
यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा यासाठी मतदान होईल. नोटिफिकेशन १ फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख ८ फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख ११ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २७ फेब्रुवारी असेल.
सहावा टप्पा
या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन ४ फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख ११ फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख १६ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख ३ मार्च असेल.
सातवा टप्पा
उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन १० फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १७ फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख २१ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख ७ मार्च असेल.
मतमोजणीची तारीख १० मार्च असेल.
राज्यनिहाय निवडणूक कार्यक्रम
उत्तर प्रदेश : ७ टप्प्यांत मतदान
पहिला टप्पा – १० फेब्रुवारी
दुसरा टप्पा – १४ फेब्रुवारी
तिसरा टप्पा – २० फेब्रुवारी
चौथा टप्पा – २३ फेब्रुवारी
पाचवा टप्पा – २७ फेब्रुवारी
सहावा टप्पा – ३ मार्च
सातवा टप्पा – ८ मार्च
मतमोजणी – १० मार्च
पंजाब, गोवा, उत्तराखंड : एकाच टप्प्यात मतदान
अर्ज भरण्याची तारीख – २८ जानेवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – ३१ जानेवारी
मतदानाची तारीख – १४ फेब्रुवारी
मतमोजणी – १० मार्च
मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत मतदान
पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी
दुसरा टप्पा – ३ मार्च
मतमोजणी – १० मार्च
विशेष म्हणजे या निवडणुकीत उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी माहिती मिळायला हवी. उमेदवारांना त्याची माहिती द्यावी लागेल. यासंदर्भात वर्तमानपत्र आणि टीव्ही वाहिन्यांवरून प्रचारादरम्यान तीन वेळा याविषयीची माहिती द्यावी लागेल. तसेच राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाईटवर होम पेजवर प्रत्येक उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती द्यावी लागेल. तसेच, याच उमेदवाराला का निवडलंले ? याचे कारण पक्षाला द्यावे लागेल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर पुढच्या ४८ तासांत ही माहिती द्यावी लागेल.
दरम्यान नागरिकांसाठी सीव्हिजिल अॅपची घोषणा. या अॅपवर कोणत्याही नियमांच्या उल्लंघनाची माहिती अपलोड करता येईल. त्यावर फक्त फोटो घेऊन अपलोड करायचा आहे. पुढच्या १०० मिनिटांत त्यावर कारवाई केली जाईल.
रोड शो, पदयात्रा, रॅलीला मनाई
कोणत्याही प्रकारे रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली वगैरेला १५ जानेवारीपर्यंत परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रकारे राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा गटांना रॅली काढायला १५ जानेवारीपर्यंत परवानगी नसेल. रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत प्रचारावर बंदी असेल. सार्वजनिक रस्ते, चौकात कोणत्याही नुक्कड सभांना परवानगी दिली जाणार नाही. विजयानंतर रॅली काढता येणार नाही. तसेच, विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी फक्त दोन व्यक्तींना परवानगी असेल.
दरम्यान परिस्थितीचा अंदाज घेऊन रॅलीला परवानगी देण्यात आली, तर स्थानिक नियमावलीचे पालन करूनच त्या घेता येईल. लोकांना मास्क आणि सॅनिटायझर द्यावे लागतील. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनेच या सभा घेता येतील. उमेदवारासह जास्तीत जास्त ५ लोकांना डोअर टू डोअर प्रचार करता येईल. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र घेतली जातील. या नियमांचे उल्लंघन केल्यास डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट, आयपीसीनुसार शिक्षा होऊ शकते असेही आयोगाने म्हटले आहे.