OmicronNewsUpdate : राज्यातील कॉलेजबाबत येत्या दोन दिवसात निर्णय , मुंबईतील शाळा पुन्हा बंद

मुंबई : राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील कॉलेज सुरू ठेवायचे की ऑनलाईन पद्धतीने चालवायचे याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेण्यात येईल असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान कोरोनासोबत ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई पालिकेमार्फत जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भातील झालेल्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये लसीकरणासाठी खुली ठेवण्यात येतील असे चहल यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णवाढीमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे . या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णवाढीचा मुलांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजीच पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकीने शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शाळा या सुरु राहणार आहेत.
नवी मुंबई , ठाण्यातील शाळाही बंदचा निर्णय
मुंबई, नवी मुंबई पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यासाठी देखील असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकीर राजेश नार्वेकर यांनी याबाबत आज माहिती दिली. या निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी तसेच इयत्ता अकरावीचे ऑफलाईन वर्ग उद्यापासून ३१ डिसेंबरपर्यंत बंद असतील. हे वर्ग पूर्वीप्रमाणे ऑनलाईन होतील. तर, इयत्ता दहावी व बारीवीचे मात्र ऑफलाईन वर्ग सुरू राहतील. अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. ठाण महापालिकेचे आयुक्त विपीन व्यास यांना देखील करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. वाढत्या कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय आणि थोडी सावधानता बाळगावी म्हणून, उद्या ४ जानेवारीपासून ते ३१ जानेवारीपर्यंतसाठी हा निर्णय जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेला आहे. याच्या अंमलबजावणीस उद्यापासून सुरूवात होईल. ”