OmicronNewsUpdate : १९ राज्यात ओमायक्रॉनचा फैलाव , दिल्लीतही कडक निर्बंध

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांनी ओमायक्रॉनला गांभीर्याने घेत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्राबरोबर दिल्लीतही केजरीवाल सरकारने यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेतला आहे. सध्या देशात ओमायक्रॉनच्या बाधितांची एकूण संख्या ५७८ वर पोहोचली असून, त्यातील १५१ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली. या विषाणूचा १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रसार होत आहे.दरम्यान देशात सोमवारी ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण आढळून आले.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे ‘दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान’नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काही गोष्टींवर निर्बंध घातले जात आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी या रुग्णांना रुग्णालयात जाण्याची तसेच ऑक्सिजनची गरज नाही किंवा आयसीयू आणि व्हेंटिलेटरचीही गरज नाही, ओमायक्रॉनची बाधा झालेले रुग्ण घरीच बरे होत आहेत, त्यामुळे फक्त नागरिकांनी काळजी घ्यावी असेही दिल्लीचे मुख्यमंत्री असं केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
As the COVID19 positivity rate has been above 0.5% for the past few days, we are enforcing Level-I (Yellow alert) of the Graded Response Action Plan. A detailed order on restrictions to be implemented will be released soon: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/tkJ9WtMaSz
— ANI (@ANI) December 28, 2021
दिल्लीतील निर्बंध असे आहेत
दिल्लीतही रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला असून शाळा, महिवाद्यालये, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क बंद राहतील.तर दुकाने आणि वस्तू सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सम-विषम तत्त्वावर उघडतील. आठवडी बाजार एका झोनमध्ये फक्त एकच उघडेल, ज्यामध्ये फक्त ५०% दुकानदारांना परवानगी असेल. मेट्रो आणि बसेस ५०% क्षमतेने धावतील. रेस्टॉरंट्स ५०% क्षमतेसह सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उघडतील.५०% क्षमतेसह बार दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत उघडतील. सलून मात्र उघडता येतील.लग्न समारंभात फक्त २० लोकांनाच परवानगी असेल.
धार्मिक स्थळे खुली राहतील मात्र भाविकांना जाण्यास मनाई आहे. सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा उपक्रमांवर बंदी टाकण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाचे राज्यांना पत्र
आरोग्य विभागाने जरी केलेल्या पत्रानुसार ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत तीन पट अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे या पत्रामधून गृहमंत्रालयाने सामान्य नागरिकांनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जे नियम बनवले जातील त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम ५० ते ६१ आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिनियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही या पत्रामधून देण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन
दरम्यान सणांच्या दरम्यान, गर्दी रोखण्यासाठी निर्बंध घालण्याबाबतही राज्यांनी विचार करावा, असा सल्लाही गृहमंत्रालयाने दिला आहे. आधी नाताळ व नववर्ष, त्यानंतर संक्रांत आणि होळी असे सण येत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार, मॉल्समधील गर्दीची अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यामुळे चिंता वाढत आहे. अशा ठिकाणची गर्दी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या फैलावाला निमंत्रण देणारी ठरू शकते त्यामुळे नागरिकांनी स्वतःच खबरदारी घेण्याचे आवाहनही केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.