IndiaNewsUpdate : युपी निवडणुक : खा. सुब्रमण्यम स्वामी केलेल्या ट्विटमुळे राजकीय चर्चेला आले उधाण !!

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजप बरोबर सर्वच पक्षांना उत्तरप्रदेशच्या निवडणुकांचे वेध लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही युपी भाजपच्या हातून जाऊ नये म्हणून पूर्ण जोर लावला आहे . मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर उत्तर प्रदेशात रात्रीची संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान हाच धागा धरून भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी उत्तर प्रदेशात ओमायक्रॉनमुळे संचारबंदी लागू होईल आणि वेळेच्या आत निवडणुका होऊ शकत नसल्याने या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि आणि सप्टेंबरमध्ये निवडणूक होतील असे ट्विट केल्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , ओमायक्रॉनमुळे लॉकडाउन लागल्यास आश्चर्यचकीत होऊ नका. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्यावरही चकीत होऊन जाऊ नका. यूपीत राष्ट्रपती राजवट लागून विधानसभा निवडणूक सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. नवीन वर्षाच्या सुरवातीला जे प्रत्यक्ष करता आले नाही ते पुढच्या वर्षी अप्रत्यक्षपणे करता येईल, असेही स्वामींनी म्हटले आहे.
Don't be surprised by a Lockdown for Omicron and postponement of UP elections to September under President Rule in UP. What could not directly be done earlier this year can be then done indirectly early next year
— Subramanian Swamy (@Swamy39) December 23, 2021
उत्तर प्रदेशातील संभाव्य विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी अनेक कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. आश्चर्यकारक मबाबा म्हणजे देशात ओमायक्रॉनची भीती असतानाही प्रचंड गर्दीत हे कार्यक्रम घेतले जात आहेत.या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांच्या या ट्विटची चर्चा होत आहे.
दरम्यान अलाहाबाद हायकोर्टाच्या विनंतीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुशील चंद्रा यांनी आपली टीम पुढच्या आठड्यात यूपीचा दौरा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक पुढच्या आठवड्यात यूपीचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात यूपीतील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे.
आयआयटी कानपूरने देशात तिसऱ्या लाटेचा इशारा दिला. त्यातच उत्तर प्रदेशात मात्र कोविड नियम धुडकावून तुफान गर्दीच्या जाहीर सभा घेतल्या जात आहे. यावरून अलाहाबाद हायकोर्टाने गुरुवारी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी निवडणूक प्रचार सभांवर बंदी घालण्यात यावी आणि शक्य असेल तर निवडणूक एक-दोन महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंतीही हायकोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यामुळे निवडणूक अयोग्य काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.