MaharashtraNewsUpdate : स्वतंत्र विदर्भाबाबत केंद्र सरकारने स्पष्ट केली अधिकृत भूमिका

नवी दिल्ली : वेगळया विदर्भाचा मुद्दा महाराष्ट्रातील चर्चेनंतर केंद्र सरकारसमोरही उपस्थित करण्यात आला तेंव्हा मोदीसरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना विदर्भ राज्याच्या स्थापनेबाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले.
विदर्भ हे स्वतंत्र राज्य बनवण्याचा काही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे का आणि असा प्रस्ताव विचाराधीन असेल तर त्यावर केंद्र सरकारने काही पावले उचलली आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. राय यांनी आपल्या लेखी उत्तरात विदर्भ राज्याच्या स्थापनेबाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान विदर्भ राज्याच्या स्थापनेबाबत कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नाही. वेगळे राज्य स्थापन करण्याबाबत अनेक मागण्या येत असतात. कधी वैयक्तिक पातळीवर तर कधी संघटनेच्या माध्यमातून देशभरातून अशा मागण्या येतात. तशी निवेदनही आम्हाला दिली जातात. मात्र, विदर्भाबाबत असा कोणताही प्रस्ताव वा मागणी आमच्याकडे आलेली नाही, असे राय यांनी नमूद केले. नवीन राज्याची निर्मिती ही मोठी आणि व्यापक परिणाम करणारी प्रक्रिया असते. आपल्या देशाच्या संघराज्य पद्धतीशी ही प्रक्रिया निगडीत आहे. अशावेळी नवीन राज्याच्या निर्मितीबाबतचा निर्णय हा केवळ आणि केवळ सर्व संबंधित घटकांचा विचार करूनच घेतला जात असतो. त्यासाठी व्यापक सहमतीचीही आवश्यकता असते, असेही राय यांनी पुढे स्पष्ट केले.