IndiaNewsUpdate : कंगनावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल का? असदुद्दीन ओवेसी यांचा सरकारला प्रश्न

अलिगढ : अभिनेत्री कंगना रणौतने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असतानाकेलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर एएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनीही संताप व्यक्त केला आहे.“कंगनाने केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर युएपीए अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली असती, तसेच पायावर गोळी झाडत तरुंगात रवानगी करण्यात आली असती,” अशी टीका करताना त्यांनी कंगनावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल का? असा प्रश्न विचारला आहे.
आपल्या वक्तव्यात ओवेसी यांनी पुढे म्हटले आहे कि , “ती ‘क्वीन’ आहे आणि तुम्ही इथले राजे आहात, त्यामुळे तिच्यावर तुम्ही कारवाई करणार नाही.” “बाबांनी तर टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत काही बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकले होते ” असे म्हणत ओवेसींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या भारतीयांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कंगनावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल का? असा प्रश्न त्यांनी योगी आणि मोदींना विचारला. “देशद्रोहाचा गुन्हा फक्त मुस्लिमांवरच लागू होतो का?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
काय म्हणाली होती कंगना ?
“देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली होती. “मी माझ्या सोशल मीडियावर एक कलाकार म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून सक्रीय असते. मी तिथे कधीही माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाही. मी तिथे नेहमीच देशाचे मुद्दे मांडत असते,” असेही कंगनाने सांगितले.
गेल्या ८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने हे वादग्रस्त वक्तव्य केले. दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.