MumbaiNewsUpdate : अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ

मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती . दरम्यान त्यांच्या मुलालाही न्यायालयाकडून तूर्त कोणताही दिलासा मिळाला नाही.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल करत, देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.
मुलालाही तूर्त दिलासा नाही
दरम्यान अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीही न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. ऋषिकेश देशमुख हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा आहे. मनी लााँड्रिंग प्रकरणी ऋषिकेशसह अन्य देशमुख कुटुंबियांनाही ईडीकडून चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले आहे.
ऋषिकेश देशमुख यांना शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे यासाठी हे ईडीने समन्स पाठवले होते. मात्र, ऋषिकेश देशमुख या चौकशीला हजर राहिले नसून त्यांनी पंधरा दिवसांची वेळ मागितली. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंज यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ नोव्हेंबरला ऋषिकेश देशमुख यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.