NCBMumbaiNewsUpdate : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात खंडणीच्या आरोपात मुंबई पोलिसांना मिळाले महत्वाचे पुरावे

मुंबई : एनसीबीने कारवाई केलेल्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सुरु केलेल्या कारवाई अंतर्गत खंडणीच्या आरोपाबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात किरण गोसावी याच्याविरोधात मुंबई पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले असून गुन्हा दाखल होताच त्याला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याच प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिचा जबाबही नोंदवून घेतला जाणार असून तिला समन्स पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बहुचर्चित क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने ताब्यात घेतले होते. तर ३ ऑक्टोबर रोजी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या दरम्यान आर्यनवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, त्याच्यावर अटकेची कारवाई होऊ नये, यासाठी बऱ्याच घडामोडी घडल्याचे आता समोर येऊ लागले आहे. २ तारखेच्या मध्यरात्रीनंतर घडलेल्या घडामोडींचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी, क्रूझ ड्रग्ज पार्टीतील पंच साक्षीदार किरण गोसावी, त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल तसेच ददलानी व गोसावी यांच्यातील मध्यस्थ सॅम डिसूझा यांच्याबाबत महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
मुंबई पोलिसांच्या तापसांतर्गत लोअर परळच्या बिग बाझारजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात पूजा ददलानी यांची मर्सिडीज कार, गोसावीची इनोव्हा आणि सॅम डिसूझाची इनोव्हा दिसत आहेत. मर्सिडीजमधून एक महिला उतरली आणि गोसावीशी काहीतरी बोलून काही वेळातच निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही महिला म्हणजे पूजा ददलानी होती की अन्य कोणी, हे स्पष्ट झालेले नाही. गंभीर बाब म्हणजे गोसावीच्या इनोव्हा कारवर पोलीस अशी पाटी दिसत आहे. त्यामुळे तो पुरता अडकण्याची चिन्हे आहेत. खंडणी वसुली तसेच पोलीस पाटीचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी पूजा ददलानीचे या प्रकरणात थेट नाव येत असल्याने जबाब नोंदवण्यासाठी तिला समन्स बजावले जाण्याचीही शक्यता आहे.
विशेष म्हणजे गोसावीचा बॉडी गार्ड म्हणवून घेणाऱ्या प्रभाकर साईल याने याप्रकरणात खंडणी वसुलीचा आरोप केला होता. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली. तडजोडीने हे डील १८ कोटीला फायनल करण्यात आले. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार होते. गोसावी आणि सॅम याच्यातील याबाबतचे संभाषण मी ऐकले आहे, असा दावा प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रावर केलेला आहे. त्याच आरोपाच्या आधारावर एसआयटीचा तपास सुरू आहे.