UttarPradeshNewsUpdate : लखीमपूर खेर प्रकरणातील आरोपी मंत्रीपुत्राचा जामीन अर्ज फेटाळला

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीत आंदोलक शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याचा आरोप असणाऱ्या आशिष मिश्राचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी फेटाळला. १२ तासांच्या चौकशीनंतर आशिषला ९ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती आणि १२ ऑक्टोबरपासून तो तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. त्याच वेळी, या प्रकरणात, पोलिसांनी इतर दोन आरोपी अंकित दास आणि वकील उर्फ काळे यांना अटक केली आहे. अंकित दासला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे तपास अधिकारी एसपी यादव यांनी सांगितले की, आशिष मिश्रा उर्फ मोनूचा जामीन अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी चिंताराम यांच्या न्यायालयाने फेटाळला आहे. यादव म्हणाले की, न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी शेखर भारतीची तीन दिवसांची पोलीस कोठडीही मंजूर केली आहे. भारतीला १२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.
३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि इतरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विरोधी पक्ष या प्रकरणावर सरकारला जोरदार लक्ष्य करत आहेत.