MumbaiNCBCaseUpdate : आर्यन अटक प्रकरणात मेहबुबा मुफ्ती यांच्या विरोधात वकिलाची तक्रार

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता त्याला धार्मिक रंगही दिला जात आहे. दरम्यान पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आर्यन खान अटकेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली असल्याचे प्रतिपादन केल्यामुळे त्यांच्याविरोध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीतील वकिलाने ही तक्रार दाखल केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत वकिलांनी एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. वकिलाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मेहबुबा मुफ्ती यांच्यावर समुदायांमध्ये द्वेष आणि अशांतता निर्माण करण्याचा हेतू असणाऱ्या प्रक्षोभक विधानासाठी एफआयआर नोंदवण्याची गरज आहे, इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
Instead of making an example out of a Union Minister’s son accused of killing four farmers, central agencies are after a 23 year old simply because his surname happens to be Khan.Travesty of justice that muslims are targeted to satiate the sadistic wishes of BJPs core vote bank.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 11, 2021
या प्रकरणात मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते कि , “चार शेतकऱ्यांच्या हत्येचा आरोपी असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कारवाई करुन उदाहरण देण्याऐवजी केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे. भाजपाच्या मतदारांना खूश करत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना टार्गेट केले जाते ही न्यायाची विटंबना आहे”.
न्यायालयाचा थोडा आदर ठेवा, विशेष सरकारी वकिलाला लगावला टोला
दरम्यान आर्यन खानला न्यायालयांकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याच्या जामिनावरील सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. यानुसार आता पुढील सुनावणी बुधवारी (१३ ऑक्टोबर) होणार आहे. सुनावणीदरम्यान आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी गर्दी होत असून त्यात कोरोनाशी संबंधित शारीरिक अंतराचे पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर न्यायालयाने केवळ ज्येष्ठ वकिलांनाच सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी ? यावरुन सरकारी वकील आणि अॅड. अमित देसाई यांच्याच खडाजंगी झाली. देसाई यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्याची विनंती केली. मात्र, विशेष सरकारी वकील सेठना यांनी गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली. यानंतरही सेठना यांनी गुरुवारचा आग्रह केल्यानंतर देसाई यांनी त्यांना न्यायालयाचा थोडा आदर ठेवा, असे म्हणत टोला लगावला.
दरम्यान, याआधी आर्यन खानच्या जामिनावर मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर याचिका आली होती. तेव्हा न्यायालयाने जामिनावर सुनावणीचा अधिकार विशेष सत्र न्यायालयाला असल्याचे सांगत ही याचिका फेटाळली होती. मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर ७ आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते . याविरोधातच सध्या आर्यन खानकडून विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.