MaharashtraNewsUpdate : सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्या घराची तब्बल नऊ तास झाडा झडती !!

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्समधील निवासस्थानावर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने आज पुन्हा छापा टाकला. या पथकाने तब्बल नऊ तास त्यांच्या निवासस्थाची झडती घेतली. या छाप्यानंतर सीबीआय कारवाईचे मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास दिल्लीहून आलेल्या सहा जणांच्या पथकाने सर्च वॉरंटसह देशमुखांच्या निवास्थानी छापा टाकला. यावेळी देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य घरी नव्हते. केवळ कर्मचारीच घरी होते. सहा जणांचे पथक घराची झडती घेत असतानाच नागपुरातील सीबीआयच्या तीन सदस्यांचे पथकही तेथे धडकले. नऊ जणांच्या या पथकाने नऊ तासांपर्यंत संपूर्ण निवासस्थानाची झडती घेतली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास सीबीआयचे पथक निवास्थानाहून बाहेर निघाले. यावेळी पत्रकरांनी पथकातील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही सांगण्यास नकार देत पथक दोन वाहनांनी कार्यालयाकडे रवाना झाले.
दरम्यान, सीबीआय पथक अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांच्या अटकेचे वॉरंट घेऊन आल्याची चर्चा शहरात पसरली. मात्र, सीबीआयकडे केवळ सर्च वॉरंटच होता, असा दावा अंतर्गत सूत्रांनी केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. सीबीआय, प्राप्तीकर विभाग व सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने वेळोवेळी देशमुखांच्या निवास्थानी छापे टाकले.