WorldNewsUpdate : शियांच्या मशिदीतील शक्तिशाली स्फोटात १०० जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तानच्या उत्तरी कुंदुंज प्रांतात आज (शुक्रवार) मशिदीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला व अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. तालिबान पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएफपीने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानमध्ये कब्जा केल्यापासून ‘आयएसआयएल’शी निगडीत दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अद्यापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कुणी स्वीकारलेली नाही. परंतु इस्लामिक स्टेट गटातील दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानच्या शिया मुस्लिम अल्पसंख्यांकांवर हल्ला करण्याचा मोठा इतिहास आहे. उत्तरी कुंदुज प्रांतामधील सय्यद अबाद मशीदत हा स्फोट झाला आहे. स्थानिक नागरिक शुक्रवारीच्या नमाजसाठी मोठ्यासंख्येने मशीदीत गेले होते.
या स्फोटाबाबत माहिती देताना , कुंदुज प्रांताचे पोलीस अधिकारी दोस्त मोहम्मद ओबैदा यांनी सांगितले की, स्फोटामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. आत्मघातकी हल्लेखोर हा नमाजसाठी आलेल्यांच्या गर्दीत सहभागी होवून आला असण्याची शक्यता आहे. तसेच, मी आमच्या शिया बांधवांना आश्वासन देतो की तालिबान त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सज्ज आहे. तपास सुरू आहे.