UttarPradeshNewsUpdate : लखीमपूर खिरी प्रकरण : फरार मंत्रीपुत्राला शोधण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या घरावर पोलिसांनी लावली नोटीस

लखीमपूर खिरी : अखेर देशातील विरोधक आणि आंदोलकांच्या दबावामुळे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावरून राजकारण चिघळू नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने यातील मुख्य आरोपी मंत्रीपूत्र आशिष मिश्रा याच्या शोधासाठी नोटीस जारी केली असून त्याला जाहीर समन्स दिले आहेत.दरम्यान सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत यूपी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.या प्रकरणात ४ दिवसांनी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पण या प्रकरणातील प्रमुख आरोपी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा पोलीस शोध घेत आहेत.
Uttar Pradesh Police pastes notice outside the residence of Union Minister Ajay Kumar Mishra in Lakhimpur Kheri, asking his son Ashish Mishra to appear before it on Oct 8 in connection with the violence pic.twitter.com/HR7sm1b2K7
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 7, 2021
या प्रकरणात पोलिसांनी जरी केलेल्या माहितीनुसार , लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आज दोन जणांना अटक केली. लवकुश राणा आणि आशिष पांडे अशी त्यांची नावे आहेत. हो दोन्ही आरोपी आशिष मिश्रा याच्या जवळचे असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एका गाडीत हे दोघेही होते, अशी माहितीही लखीमपूर पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून या दोघांची चौकशी चालू आहे. दरम्यान पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या घरावर नोटीस लावली आहे. आशिष मिश्राने उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाली १० वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात हजर व्हावे , असे पोलिसांनी नोटिसमध्ये म्हटले आहे.
९ पोलीस अधिकाऱ्यांकडून होते आहे चौकशी
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्रा याच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. शेतकऱ्यांना चिरडताना आशिष मिश्रा हा गाडी चालवत होता. तसेच गाडीतून उतरल्यानंतर आशिष मिश्राने गोळीबार केला आणि तो पळाला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. IANS ने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान दुसऱ्या बाजूला या प्रकरणात उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक मुकुल गोयल यांनी ९ पोलिस अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती नेमली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक या चौकशी समितीचे नेतृत्व करतील.डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांच्यासोबतीला पोलिस अधीक्षक सुनील कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरुण कुमार सिंह, दोन विभागीय पोलिस अधिकारी, तीन पोलिस निरीक्षक आणि एक पोलिस उपनिरीक्षक असेल. यूपीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली.
घटनेचा नवा व्हिडीओ
लखीमपूर खिरीमधील हिंसाचार घटनेचा आणखी एक नवा व्हिडिओ बुधवारी समोर आला आहे. या हिंसाचारात तीन कार सामील असल्याचे दिसत असून यातील एक कार भरधाव वेगाने येत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाताना दिसत आहेत तर तिच्या मागे दोन कार जाताना दिसत आहेत.
दुसरीकडे, लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं आहे. तसेच या प्रकरणी कोणाविरोधात एफआयआर दाखल झाला आहे? आणि किती जणांना अटक केली आहे? याचा सद्यस्थिती अहवाल शुक्रवारी म्हणजे उद्या सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी पोलिस इतर आरोपींचा शोध घेत असून छापेमारी सुरू आहे. पण केंद्रीय मंत्र्यांचा मुलचा अद्याप शोध लागलेला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितलं.