MumbaiNewsUpdate : आयकर खात्याच्या धाडीविषयी राष्ट्रवादीचे आव्हानात्मक उत्तर

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून ईडी आणि आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांवर सुरु असलेल्या इन्कम टॅक्स व ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड संतापली आहे. ‘कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपकडून विरोधकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ‘मात्र, भाजपच्या दबावाला महाविकास आघाडी सरकार किंवा राष्ट्रवादी अजिबात बळ पडणार नाही. आम्ही घाबरणार नाही. आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होऊनच जाऊ द्या, आम्ही तयार आहोत,’ असे थेट आव्हानच राष्ट्रवादीने दिले आहे.
खा . सुप्रिया सुळे म्हणाल्या…
दरम्यान दिल्लीतील सत्ताधीशांनी कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री आजवर कधी दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला ठणकावले आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात देवदर्शनासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी आज याबाबत विचारले. पवार कुटुंबाला टार्गेट केले जात आहे असे आपल्याला वाटते का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ‘अजितदादांचे नातेवाईक हे माझे सुद्धा नातेवाईक आहेत. दादा आणि आम्ही वेगळे नाही. आमचे कुटुंब एकच आहे आणि संघर्ष ही पवार कुटुंबाची खासियत आहे. ‘दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे कधी झुकला नाही आणि यापुढंही झुकणार नाही,’ असे सुळे म्हणाल्या.
राज्य सरकारला बदनाम करण्याचा हा प्रकार
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य केले. ‘एखाद्या ठिकाणी चुकीचे वाटत असेल तर त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवता येतो. अजितदादांच्या प्रकरणातही असे खुलासे मागवता येऊ शकले असते. परंतु, केवळ बदनामी करण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत. हा तपास यंत्रणांचा गैरवापर आहे. विरोधकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी ही कारवाई होत आहे. राज्य सरकारला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ,’ असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.
‘भाजपच्या काळात काय-काय झाले हे आता पुढे येईल. आता सुरुवात झाली आहे. कुठल्या मंत्र्यांनी, नेत्यांनी किती बँका बुडवल्या? त्यात किती भाजपवाले आहेत? त्यांनी पैसा कुठे वळवला आहे हे भविष्यात आम्ही बाहेर काढणार आहोत. आम्ही नुसते आरोप करत बसणार नाही. पुराव्यासकट आम्ही ही प्रकरणे समोर आणू,’ असेही मलिक म्हणाले.