IndiaNewsUpdate : देशातील कोरोना लसीकरण १०० कोटीकडे : पंतप्रधान

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर काम करत ९३ कोटी डोसचा आकडा ओलांडला असून लवकरच १०० कोटी डोस पूर्ण होणार आहेत, ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरम्यान नागरिक समस्या घेऊन येतील आणि त्यानंतर काही पावले उचलली जातील, अशी सरकारकची मानसिकता नाही. या सरकारी मानसिकतेतून आम्ही पूर्णपणे बाहेर पडत आहोत. म्हणूनच आता आम्ही सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ३५ पीएसए ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण व्हर्च्युअल पद्धतीने पार पडले. यावेळी पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पिटल येथे विद्युत मंत्रालयाच्या माध्यमातून आणि आरईसी फाउंडेशनच्या सीएसआरमधून साकारण्यात आलेल्या १७०० एलपीएम क्षमतेच्या पीएसए प्लांटचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी दळवी हॉस्पिटल येथे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, आयुक्त विक्रम कुमार, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मागील सहा ते सात वर्षांपूर्वी केवळ काही राज्यातच एम्सची सुविधा उपलब्ध होती. आज मात्र प्रत्येक राज्यात एम्स साकारण्याचे काम सुरु असून देशातील एम्सची संख्या आता ६ वरून २२ पर्यंत पोहोचली आहे. एम्सचे सशक्त जाळे तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. शिवाय देशातील प्रत्येक राज्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.