AkolaNewsUpdate : ‘वंचित’ने अकोला जिल्हा परिषदेचा बालेकिल्ला ठेवला मजबूत

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात आघाडी करून निवडणूक लढणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादीने केवळ तीन जागा जिंकल्या असून अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं सर्वाधिक सहा जागा जिंकत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. सहा जागा जिंकल्यामुळे वंचितची जिल्हा परिषदेतील सत्ताही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीचे विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्याने प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकले नाहीत तरीही त्यांच्या अनुपस्थितीत स्थानिक नेत्यांना सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी व बलाढ्या भाजपशी सामना करून वंचितने या निवडणुकीत बाजी मारली आहे. अकोल्यात १४ जागांवर पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला एक, राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजप, काँग्रेस व बच्चू कडू यांची प्रहार संघटनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. तर, अपक्षांना दोन जागा मिळाल्या.
विजयी उमेदवारांची नावे
अकोलखेड : जगन्नाथ निचळ (शिवसेना), घुसर : शंकरराव इंगळे (वंचित), लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे (अपक्ष), अंदूरा : मीना बावणे (वंचित), दगडपारवा : सुमन गावंडे (राष्ट्रवादी), अडगाव : प्रमोदीनी कोल्हे (अपक्ष), कुरणखेड : सुशांत बोर्डे (वंचित), बपोरी : माया कावरे , भाजप), शिर्ला : सुनील फाटकर (वंचित), देगाव : राम गव्हाणकर (वंचित), कानशिवणी : किरण अवताडे मोहोड (राष्ट्रवादी), दानापूर : गजानन काकड (काँग्रेस), कुटासा : स्फूर्ती गावंडे (प्रहार), तळेगाव बु. : संगिता अढाऊ (वंचित.)